

Three Dead in Waluj Area Within Two Days
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
वाळूज महानगर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात साजापूर येथे एका वीटभट्टी कामगाराचा तलावात मृतदेह आढळला, पंढरपुरात एका तरुणाने आत्महत्या केली, तर एमआयडीसी परिसरात झालेल्या रस्ते अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणांत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटनाः साजापूर तलावात आढळला मृतदेह मिळालेल्या माहितीनुसार, चंदू कचरू जाधव (४३, रा. साठेनगर, वाळूज, ह.मु. साजापूर) हे साजापूर येथील पाझर तलावाजवळील वीटभट्टीवर कुटुंबासह कामाला होते. मंगळवारी (दि. ३१) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चंदू हे तलावातील पाण्यात बेशुद्धावस्थेत तरंगताना आढळून आले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दुसरी घटनाः तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या दुसऱ्या घटनेत, पंढरपूर येथे रा-हणाऱ्या संजयकुमार सुंदर (२२, मूळ रा. उत्तर प्रदेश) या तरुणाने २९ मार्च रोजी राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अपघातात वृद्धाचा मृत्यू
तिसरी घटना वाळूज एमआयडीसी परिसरात २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. प्रल्हाद लक्ष्मण राठोड (६७, रा. सुमेरनगर, मुंबई) हे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. सिद्धार्थ पटाईत यांनी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना २९ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.