

Farmer tention due to lack of rain in Nachanvel area
नाचनवेल : नाचनवेल परिसरात अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांनी खरिपातील पावसावर कपाशी, मका, उडीद, मुग, भुईमूग यांसारख्या पिकांची पेरणी केली आहे. परंतु आता उगवलेली पिके माना टाकू लागली आहे.
हवामान खात्याने यंदा पावसाचे वेळेवर आगमन होईल अशी भाकिते केली होती, त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचे प्रमाण अधिक राहिल्याने वातावरणातील आर्द्रतेचा अभाव जाणवू लागला.
ढगाळ वातावरण व वाऱ्याचे प्रमाण अधूनमधून जाणवत असले, तरीही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. परिसरातील तलाव, ओढे, विहिरी कोरड्याच आहेत. उगवलेल्या पिकांना येत्या आठवडाभरात पाणी न मिळाल्यास ती हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे चिंतेत असून काहींना दुबार पेरणीचा विचार करावा लागत आहे.
मागील दोन वर्षांत पावसाने चांगली साथ दिली होती, तरीही काहीवेळा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याचा फटका सावरत शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामाकडे आशेने पाहिले होते. पण पावसाच्या अनियमिततेमुळे ही आशा धुळीला मिळण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, बाजारपेठांत शुकशुकाट जाणवत आहे. जर उरलेल्या हंगामात जोरदार पाऊस पडला नाही, तर नाचनवेल परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.