

Asphalt road deteriorated within a year; Entrepreneurs troubled by potholes and dust
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज औद्योगिक क्षेत्र ते सोलापूर-धुळे महामार्गाला जोडणारा रस्ता ठिकठिकाणी उखडून एका वर्षातच रस्त्याची चाळणी झाली आहे. दोन किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर खड्डे तसेच वाहनधारकांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे उद्योजकांसह कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
करोडी, साजापूर तसेच घाणेगाव गट नंबरमध्ये शेकडो लहान-मोठ्या कंपन्या आहेत. वाळूज औद्योगिक क्षेत्रात ये-जा करण्यासाठी त्यांना सोयीचा रस्ता नव्हता. यामुळे उद्योजकांना आपल्या मालाची ने-आण करताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असे. शिवाय वाळूज एमआयडीसीत जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता असल्याने करोडी, आसेगाव, फतुलाबाद, खोजेवाडी, पोळ रांजणगाव, माळीवाडा, फतियाबाद येथील शेकडो कामगार याच रस्त्याने ये-जा करत असतात.
रस्त्याअभावी उद्योजक व कामगारांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गत वर्षी एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने जवळपास साडेआठ कोटींचा निधी खर्च करून वाळूज एमआयडीसीतील कासबर्ग कंपनी ते सोलापूर-धुळे महामार्ग या दोन किलोमीटर लांब व साडेसात मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या मजबुतीचे काम करून घाणेगाव येथील लघुसिंचन तलावाजवळ एक पूल उभारून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
मात्र वर्षभरातच सदरचा रस्ता ठिकठिकाणी उखडून रस्त्याची चाळणी झाल्याने या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. संबंधितांनी तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन उद्योजक तसेच कामगारांची खड्डे व धुळीमुळे होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड
कासबर्ग कंपनी ते सोलापूर-धुळे महामार्ग या दोन किलोमीटर रस्त्याचे साडेआठ कोटींचा निधी खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र कामाचा दर्जा सांभाळला न गेल्याने वर्षभरातच रस्ता उखडून रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्यावरील खड्डे व धुळीमुळे वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड झाले आहे. डोळ्यात धुळ जात असल्याने बऱ्याचदा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत.