

केज: केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वस्तीवरील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला लग्नासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ही शाळेतून घरी जात असताना विशाल मुंडे आणि इतर दोघांनी तिचा पाठलाग करून तिचा व्हिडिओ व फोटो काढले. त्या नंतर रमेश नागरगोजे याने ती अल्पवयीन मुलगी ही शेतात असताना तिला फोटो आणि व्हिडिओचा संदर्भ देत शिट्ट्या वाजवल्या आणि अश्लील हावभाव केले. तसेच अनिकेत घुगे हा मोबाईल वरून त्या अल्पवयीन मुलीशी संपर्क करत होता. तसेच त्याने पीडितेच्या वडिलांच्या मोबाईल वरून तिच्याशी संपर्क साधला. त्याच बरोबर अनिकेत याने तिला त्याच्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आई-वडिलांना जिवे मारीन अशी धमकी दिली. तसेच कुशावर्ती उर्फ कुशाबाई हिने त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा चुकीचा सल्ला देत प्रोत्साहन दिले.
त्या नंतर हा सर्व प्रकार पीडितेने कुटुंबीयांना सांगितला. त्यावरून अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अनिकेत तुकाराम घुगे (रा. होळ), विशाल सूर्यकांत मुंडे, रमेश बबन नागरगोजे, कुशावर्ती उर्फ कुशाबाई रावसाहेब शेप (सर्व रा. लाडेवडगाव) या चौघा विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच चारही आरोपी फरार झाले असून पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.