

Thousands of liters of water wasted due to burst water pipe
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पातून अजिंठा गावात पिण्याचे पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन अजंता लर्निंग हब शाळेसमोरील फिल्टर प्लांटजवळ फुटल्याने मागील चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. फुटलेल्या पाईपमुळे अजिंठा-बुलडाणा महामार्गावर सतत पाणी वाहत असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या विशेष म्हणजे पाईपलाईनवरील चार एअर व्हॉल्व्ह मागील दोन वर्षांपासून निष्क्रिय असल्यामुळे पाईप वारंवार फुटत आहेत. या गळतीकडे पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
या वर्षी समाधानकारक पावसामुळे अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरून दुथडीभरून वाहत होता. मात्र, पाणीपुरवठा यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मौल्यवान पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. प्रकल्पापासून फिल्टर प्लांटपर्यंत एकूण चार एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून हे एअर व्हॉल्व्ह निष्क्रिय अवस्थेत आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीची प्रतीक्षा सुरू आहे.
यामुळे पाईपलाइनमधील हवेचा दाब बाहेर न निघाल्याने पाण्याच्या प्रवाहाचा प्रचंड दाब निर्माण होतो, परिणामी पाईप वारंवार फुटून हजारो लिटर पाणी वाया जाते. प्रकल्पातून गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी ३० एचपी क्षमतेच्या दोन मोटारी मागील वर्षी विकत घेण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही मोटारी काही महिन्यांपासून सतत २४ तास कार्यरत असल्याने तांत्रिक बिघाडाचा धोका निर्माण झाला आहे.
गावातील टाकीची साठवण क्षमता सुमारे ६.५ लाख लिटर असून, ती पूर्ण भरण्यास सहा ते सात तास लागतात. सध्या पाईप फुटल्यामुळे टाकी भरण्यास अधिक वेळ लागत असून, पूर्वी तीन दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता पाच ते सहा दिवसांच्या अंतरानेच केला जातो. नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, त्वरित एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती करून पाईपलाइनची देखभाल करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.