

This year, 144 TMC of water was released from Jayakwadi.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे यंदा जायकवाडीसारखे मोठे धरण जुलैअखेरीस भरले. तेव्हापासून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सातत्याने धरणाचे दरव ाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत जायकवाडी धरणातून तब्बल १४४ टीएमसी इतके पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. जायकवाडीची क्षमता पाहता हे पाणी दीड जायकवाडी भरेल इतके आहे.
मराठवाड्यात यंदा विक्रमी पाऊस झाला. अगदी उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यापासून दमदार पावसाला सुरूवात झाली. मे, जून, जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच लहान मोठी धरणे जुलैअखेरीसच तुडूंब भरली. जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असून त्याची क्षमता ही तब्बल १०५ टीएमसी इतकी आहे. यंदा जायकवाडीचे दरवाजेही ऑगस्टच्या सुरूवातीलाच उघडावे लागले.
धरण भरल्यानंतरही वरच्या भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने जायकवाडीच्या दरवाजांमधून गोदा वरी नदीपात्रात विसर्ग करावा लागला. सप्टेबर महिन्यात तर हा विसर्ग ३ लाख ६ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत जायकवाडीतून सातत्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत होता.
यंदाच्या मोसमात जायकवाडीतून तब्बल १४४ टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. अलिकडच्या काळातील हा विक्रम आहे. सध्याही धरणातून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.