Marathwada Protest History : पशुधन खात्याची गाय दारात बांधली अन् व्हेटर्नरी डॉक्टरवर झाली होती कारवाई

मराठवाड्याचा इतिहास 1972 ते 75 या काळात झालेल्या आंदोलनाशिवाय पूर्णच होणे शक्य नाही. या आंदोलनात सक्रिय भाग नोंदविलेले डॉ. मनसुख आचलिया यांनी अनेक किस्से सांगितले.
Marathwada Protest History
Marathwada Protest History: पशुधन खात्याची गाय दारात बांधली अन् व्हेटर्नरी डॉक्टरवर झाली होती कारवाईFile Photo
Published on
Updated on

Marathwada Protest History part 7

उमेश काळे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचा इतिहास 1972 ते 75 या काळात झालेल्या आंदोलनाशिवाय पूर्णच होणे शक्य नाही. या आंदोलनात सक्रिय भाग नोंदविलेले डॉ. मनसुख आचलिया यांनी अनेक किस्से सांगितले. भ्रष्ट व्यवस्थेविरूद्ध युवकांच्या मनात एवढी चिड होती, की संभाजीनगरात घाटी हॉस्पिटलसमोर एका व्हेटर्नरी डॉक्टरने पशुधन खात्याची गाय घरी पाळण्यासाठी आणल्याचे कळाल्यानंतर आम्ही हा प्रकार उघडकीस आणला. ताबडतोब त्या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई झाली, अशी एक आठवण त्यांनी सांगितली.

Marathwada Protest History
Vikas Andolan : मराठवाड्याला मुख्यमंत्रिपद मिळवून देणारे विकास आंदोलन काय होते?

डॉ. आचलिया हे मेडिकलचे विद्यार्थी, पण युक्रांदशी संबंध आल्यानंतर ते आंदोलनात सक्रिय झाले. 72 ला लातुरात दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मोठे आंदोलन झाले. युक्रांद नेते डॉ. कुमार सप्‍तर्षी यांनी पुढे या आंदोलनाचे केंद्र संभाजीनगर येथे हलविले. या या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका होत असत.

सत्याग्रहाचा अभिवन प्रयोग

शिष्यवृत्तीवाढीचा विषय मराठवाडाभर करण्याचे ठरले. तेव्हा गुलमंडीवर अभिवन सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. आम्ही 25 विद्यार्थी होतो. शहराच्या मध्यवस्तीत सत्याग्रह झाल्याने पोलिसांनी आम्हाला उचलून अक्षरश: गाडीत टाकले. त्यामुळे बरीच दमछाक झाली. दुसर्‍या दिवशी आमच्या आंदोलनात मिलिंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाली. ही संख्या शंभरावर गेली. प्रत्येक विद्यार्थ्याला उचलावयाचे किंवा बकोटीला धरून गाडीत टाकावयाचे हे पोलिसांकरिता अवघडच ठरले. या आंदोलनाला डॉ. सप्‍तर्षींचे मार्गदर्शन मिळाले, तसेच सुभाष लोमटे, निशिकांत भालेराव, मानवेंद्र काचोळे, श्रीराम जाधव आदी सहभागी होत. वीस बावीस दिवस हा कार्यक्रम चालू होता. शेवटी तर ही संख्या एक हजारावर गेली. त्यानंतर मात्र तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी चर्चेसाठी बोलाविले, अशी आठवण डॉ. आचलिया यांनी सांगितली.

Marathwada Protest History
Marathwada Vikas Andolan : वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन

संभाजीनगरात लाठीमार, गोळीबार

वसमत गोळीबारानंतर विकास आंदोलनाचा वणवा मराठवाड्यात पेटला. संभाजीनगरात मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर औरंगपुर्‍यात लाठीमार, गोळीबार झाला. त्यात दोघेजण जखमी झाले. आंदोलन शांततामय मार्गाने व्हावे, असे आवाहन गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, कुमार सप्‍तर्षी आदींनी केले. पण लोक ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हते. शैक्षणिक सुधारणांबरोबरच सोलापूरच्या मेडिकल कॉलेजचे सरकारीकरण, भूमिहिन आदिवासींना जमीन वाटप या सामाजिक प्रश्‍नांची तड लागावी, असे प्रयत्न झाले. कालांतराने मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिलाल. या आंदोलनात माझ्र्यावर 25 तर परभणीच्या रामराव जाधव यांच्यावर दोनशे गुन्हे नोंद होते, असे आचलिया म्हणाले. या काळातच सरकारी गाड्या शासकीय अधिकारी व्यक्‍तिगत कामांसाठी वापरत. युक्रांदने त्याविरोधात मोहिम सुरू केली आणि अशा अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले.

अखेर आंदोलन घेतले मागे

या आंदोलनातील कार्यकर्ते अण्णा खंदारे यांनी काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यात म्हटले, वसमत गोळीबारानंतर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. वसमतची बातमी सगळीकडे पसरताच पूर्ण मराठवाडाभर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. दोन दिवसांतच सर्व परीक्षाकेंद्रे ओस पडली. पुढील पंधरा दिवस मराठवाड्यातील लहानथोर रस्त्यावर उतरले. मराठवाड्याचा विकास होत नसल्यामुळे रोजगार नाही व असलेले रोजगार भ्रष्टाचारामुळे सामान्यांना मिळत नाहीत, ही भावना घेऊन गावोगावी मोर्चे निघत होते. आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः, डॉ. भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, विजय गव्हाणे यांनी केले. एस. टी.चा मोफत प्रवास, तालुका कचेरीवर निदर्शने इत्यादी कार्यक्रमांनंतर अंबाजोगाई येथील माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात आंदोलन पुढे चालविण्याचा निर्णय झाला. आमदार-खासदार-लोकप्रतिनिधींना घेराव घालून राजीनामा मागण्याच्या कार्यक्रमामुळे जबरदस्त दहशत निर्माण झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधी खाजगी कार्यक्रमालासुद्धा हजर राहत नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चे काढण्याचे ठरले. या मेळाव्यास युक्रांदबरोबरच युवक काँग्रेसचे काही नेते आले होते. या आंदोलनामुळे सरकार अडचणीत आले, म्हणून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला, पण उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी तो हाणून पडला. आंदोलनात अनेक लोक, अनेक उद्देश घेऊन आले होते. माझ्या बहिणीच्या व भावाच्या एकत्रित लग्नसमारंभाला उपस्थित असलेले खासदार श्री. सयाजीराव पंडित यांना आम्ही घेराव घातला.

परंतु पुढे निरनिराळ्या शक्ती आंदोलन फोडण्यासाठी सक्रीय झाल्या. वैचारिक भूमिकेबद्दल व कार्यक्रमाबाबत स्पष्टता नसल्यावर आंदोलन चालवणे कठीण असते, याचा अनुभव येऊ लागला. सरकारने मराठवाड्यासाठी काही प्रकल्प, योजना जाहीर केल्या. तेवढ्यावरच समाधान मानावे असा सूर मराठवाड्यातील कर्ते-धर्ते म्हणविणार्यांकडूनही निघू लागला. पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या. अनेक विद्यार्थी नेत्यांची व बहुसंख्य जनतेची इच्छा नसतानाही, आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले गेले. काँग्रेसच्या कूटनीतीने युक्रांदच्या अननुभवी नेतृत्वावर मात केली.
डॉ. मनसुख आचलिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news