

Thieves continue their rampage in CIDCO; now even temples are unsafe
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिडको भागात घरफोड्या, दरोडे आणि चोऱ्यांचे सत्र अव्याहतपणे सुरू असतानाच, आता चोरट्यांची मजल थेट देवाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नसल्याचे उघड झाले असून, शहरातील मंदिरेही आता सुरक्षित राहिलेली नाहीत. सिडको परिसरातील एन-५ गुलमोहर कॉलनी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटीसह २२ हजारांचा ऐवज लंपास केल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (दि.७) सकाळी उघडकीस आला.
याप्रकरणी नर्मदेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सदस्य शुभम मनोहर भामरे (२९, रा. एन ५ गुलमोहर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंदिर बंद करण्यात आले होते. त्यावेळी दानपेटी व इतर सर्व वस्तू सुरक्षित होत्या. मात्र, मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी व्हावीकर गुरुजी हे पूजेसाठी गेले असता, त्यांना मंदिराच्या लाकडी दरवाजाचे ग्रील व कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले.
त्यांनी आत जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटी, ५ हजार रुपये किमतीच्या ३ पितळी समया आणि २ हजार रुपये किमतीचे ३ पितळी नंददीप गायब असल्याचे निदर्शनास आले. दानपेटीत सुमारे १० ते १५ हजार रुपयांची रोकड होती. असा एकूण अंदाजे २२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
पंधरा मिनिटांत देवाच्या दारात डल्ला
मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, पहाटे ५:१८ वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. गाभाऱ्याच्या दारातून आत घुसून त्यांनी अवघ्या १० ते १५ मिनिटांत दानपेटी आणि पितळी समया उचलून तेथून पोबारा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाऊसाहेब जगताप करत आहेत.