

They made a deal for the car, took the money and drove the car away again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कारचा सौदा केला, सौद्यापोटी चार लाख ७० हजार रुपये घेतले. कार ग्राहकाच्या ताब्यात दिली; मात्र नावावर करण्याची वेळ येताच रात्रीच्या अंधारात तीच कार घरासमोरून उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जिल्हा कोर्टासमोरील परिसरात घडली. या प्रकरणी रोहित राजेश बोमारडे (रा. म्हाडा कॉलनी, अकोला) याच्या विरूद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव पुनमचंद साळुंके (२६, रा. कन्नड) यांनी एजंट रोहित बोमारडे याच्यासोबत १५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सेशन कोर्टासमोर (एमएच-४०-सीए-६५७०) कारचा व्यवहार केला. १०० रुपयांच्या बॉन्डवर नोटरी करून कारची किंमत ५ लाख २० हजार रुपये ठरली. व्यवहारानंतर साळुंके यांनी २० ऑगस्ट रोजी बोमारडे याला ४ लाख ५० हजार रुपये रोख दिले, तर २० हजार रुपये फोन-पेवरून पाठविले. उर्वरित ५० हजार रुपये देणे बाकी होते. ५ सप्टेंबर रोजी कार साळुंके यांच्या आईच्या नावावर करून देण्याचे ठरले होते.
मध्यरात्री कार गायब
३१ ऑगस्ट रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास साळुंके यांच्या घरासमोर उभी असलेली कार बोमारडे याने कोणतीही पूर्वकल्पना न देता नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर साळुंके यांनी बोमारडे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने फोन घेतला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अखेर गुन्हा दाखल
दरम्यान, बोमारडे याच्याबाबत चौकशी केली असता तो वाहनांचा एजंट असून मूळ मालकांकडून वाहने १० ते १५ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेतो आणि ती स्वतःची असल्याचे भासवून बॉन्डवर इतरांना विकत असल्याची माहिती साळुंके यांना मिळाली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे साळुंके यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विकास चव्हाण करीत आहेत.