

They arrived in a Creta and made off with a Scorpio in eight minutes
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : क्रेटा कारमधून आलेल्या हायटेक चोरट्यांच्या टोळीने आधुनिक उपकरणांचा वापर करत अवघ्या ८ मिनिटांत घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. २) पहाटे ४:१६ वाजेच्या सुमारास सातारा गावातील गट क्र. ३०१ मध्ये घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आकाश प्रकाश चव्हाण (३०, रा. सातारा गाव) यांनी त्यांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (एमएच-२०-एफयु-९१९९) नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. शुक्रवारी पहाटे ४:१६ ते ४:२३ वाजेच्या दरम्यान क्रेटा कारमधून काही चोरटे चव्हाण यांच्या घरासमोर आले.
त्यांनी अत्यंत शिताफीने स्कॉर्पिओ गाडीचा दरवाजा उघडला त्यानंतर एकाने बॉनेट उघडून आधुनिक यंत्राद्वारे इग्निशन सुरू केले आणि अवघ्या ८ मिनिटांत चोरटे स्कॉर्पिओ घेऊन तेथून पसार झाले.
चोरट्यांची हायटेक 'मोडस ऑपरेंडी'
सीसीटीव्हीतील दृश्ये आणि गाडी पळवण्याच्या पद्धतीवरून या टोळीमध्ये एखादा निष्णात मेकॅनिक आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाची सखोल माहिती असलेला व्यक्ती असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१) सॉफ्टवेअर हॅकिंग : हे चोरटे पारंपरिक पद्धतीने कुलूप न तोडता, आधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस किंवा स्कॅनरच्या साहाय्याने गाडीचे सेन्सर हॅक करतात.
२) ईसीएम छेडछाडः दरवाजा उघडल्यानंतर ते थेट बॉनेट उघडून गाडीच्या इंजिन कंट्रोल मॉड्युल (ईसीएम) मध्ये छेडछाड करतात. ३) नवीन कोडिंग: टॅबद्वारे गाडीचे मूळ कोर्डिंग बायपास करून नवीन चावीचे कोडिंग मॅच केले जाते, ज्यामुळे गाडीचा सायरन वाजत नाही आणि इग्निशन तत्काळ सुरू होते.
शहरात महागड्या गाड्यांच्या चोरीचे सत्र
अवघ्या काही मिनिटांत अत्यंत शिताफीने गाडी पळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शहराच्या विविध भागांतून अशाच हायटेक पद्धतीने महागड्या चारचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. एका शहरातून गाडी चोरून ती रातोरात राज्याबाहेर किंवा परराज्यात विकणाऱ्या मोठ्या टोळ्या यात सक्रिय असण्याची शक्यता आहे.