

1,390 kg stock of banned plastic seized
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला प्रतिबंधित प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. पथकाने रविवारी (दि.४) रेल्वे स्टेशन परिसरातील सिल्क मिल्क कॉलनीतील जनता किराणावर अचानक धाड टाकून तब्बल १ हजार ३९० किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या प्लॅस्टिकची अंदाजे किंमत चार लाख रुपयांपेक्षा अधिक असून, त्यामध्ये दोन लाखांहून अधिक प्रतिबंधित कॅरीबॅगचा समावेश आहे. संबंधित प्रतिष्ठानावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या साठवणुकीसह त्याची विक्री आणि वितरण करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेअंतर्गत सिल्क मिल्क कॉलनीतील जनता किराणा येथे अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लॅस्टिक कॅरीबॅगचा साठा आढळून आला.
हा संपूर्ण साठा पथकाने ताब्यात घेतला. एकाच ठिकाणी दोन लाखांहून अधिक कॅरीबॅग आढळल्याने प्रतिबंधित प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जात असल्याचे या कारवाईतून समोर आले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित प्लॅस्टिकची नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे.
तसेच शहरातील प्रतिबंधित प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी मनपाकडून साठवणूक, विक्री आणि वितरणाची साखळी तपासली जात आहे. ही कारवाई मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिक मित्र पथकाचे देविदास सुसर, सुवर्णसिंग परदेशी, बालाजी साबळे, नारायण फुके, रावसाहेब विधाते, किसन निकम, संतोष बनकर, दौलत म्हस्के, अरुण काकरवल, गौतम वानखेडे, स्वच्छता निरीक्षक प्रवीण राठोड, आनंद तांबे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कारवाई आणखी तीव्र होणार
प्रतिबंधित प्लॅस्टिकमुक्त शहर हे मनपाचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसोबतच गरजेनुसार पुढील कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा करून कारवाईपासून बचाव होईल, असा गैरसमज करून घेऊ नये. शहरातील अशा ठिकाणांवर मनपा पथकाची नजर असून, नियमभंग आढळल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.