

There is a lot of confusion in the voter list of the Municipal Corporation.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने नुकतीच प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी वादग्रस्त ठरली आहे. या यादीत घोळच घोळ करण्यात आला आहे. प्रभागाच्या सीमारेषेलगतचे सुमारे २ ते ३ हजार मतदार लगतच्या प्रभागामध्ये पळविण्यात आले आहेत. हा प्रकार प्रत्येक प्रभागामध्ये झाल्याने आक्षेपांचा पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाला २३७ वर आक्षेप प्राप्त झाले आहेत. प्रशासनाने ग्रुप आक्षेप स्वीकारण्यास नकार दिल्याने मतदारांतून संताप व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी वापराव्यात, असे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. त्यासाठी १ जुलै २०२५ दिनांक ठरवून दिला आहे. या मतदार याद्यावरून महापालिकेच्या निवडणूक विभागाने अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभागणी करून प्रारूप मतदार याद्या तयार केल्या आहेत. या मतदार याद्यांचे विभाजन प्रत्यक्ष स्थळपाहणी करून होणे अपेक्षित होते. परंतु तसे न करताच याद्यांचे विभाजन केले गेले. त्यामुळे प्रत्येक प्रभागाच्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रशासनाने घोळच घोळ केल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या.
या मतदार याद्यांची तपासणी इच्छुक उमेदवारासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यात १० ते १५ नव्हे तर ५० ते १०० नव्हे तर तब्बल दीड ते तीन हजार मतदारांची एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात पळवापळवी केली आहे. सीमारेषेलगतच्या नावांचा यात समावेश असून, यात प्रभाग २१ मधील २२०० मतदार प्रभाग २० मध्ये, तर मुकुंदवाडीच्या प्रभागातील तब्बल १४६० मतदार रेल्वेपटरी लगत टाकले. प्रभाग ९ मधील ३७०० मतदार प्रभाग १० मध्ये टाकण्यात आले. २४ चे मतदार ते २६ मध्ये, १८ मधील काही मतदार २८ मध्ये टाकण्यात आले, असेच प्रकार सर्व प्रभागांमध्ये झाले आहेत. या हेराफेरीची माहिती इच्छुक उमेदवारांना कळताच त्यांनी महापालिकेत धाव घेतली आहे.
मनपाच्या निवडणूक विभागात आक्षेप दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी प्रचंड गोंधळ घातला. संतप्त नागरिक कार्यालयातील सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्या अंगावर धावून गेले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओही करणे सुरू होते. त्यामुळे पाटील या कार्यालयातून निघून गेल्या.
दोन मुदतवाढीनंतरही घोळ
महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांची केवळ प्रभागनिहाय विभागणी करणे आवश्यक होते. परंतु या विभागणीच्या नावाखाली प्रशासनाने थेट मतदारांचीच पळवापळवी केली आहे. दोन वेळा मुदतवाढ मिळूनही याद्यांत घोळ का, असा सवाल उपस्थित होत आहे.
वैयक्तिक तक्रारीची सक्ती
प्रत्येक प्रभागातील सुमारे ७७ १५०० ते ३६०० मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित केले आहेत अन् आता आक्षेप प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या घ्यावा, अशी सक्ती महापालिकेने केली आहे. ग्रुप आक्षेप स्वीकारण्यास नकार देत आहेत.
अभय भोसले, नागरिक, शिवशंकर कॉलनी