

Man arrested for trying to run over police officer with rickshaw
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गणवेश न घालता रिक्षा दामटणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकाने दंड करत असल्याच्या रागातून थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुमारे २० फुटांपर्यंत फरपटत नेले. बाबा चौकात रविवारी (दि.२३) दुपारी घडलेल्या घटनेत वाहतूक पोलिस अंमलदार तुकाराम टाकसाळे गंभीर जखमी झाले. युसूफ मोहंमद अली अन्सारी (२७, रा. दौलताबाद) असे रिक्षाचालकाचे नाव असून, त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासांत बेड्या ठोकून वेदांतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याची येथेच्छ धुलाई केल्यानंतर सोमवारी (दि. २४) वेदांतनगर पोलिसांनी रेल्वेस्टेशन ते बाबा चौक अशी धिंड काढून माज उतरविला.
रविवारी बाबा चौकात छावणी वाहतूक शाखेचे अंमलदार तुकाराम टाकसाळे हे कर्तव्यावर असताना त्यांना एक रिक्षाचालक (एमएच-२० ईके-४६३२) विनागणवेश असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, मात्र रिक्षाचालक युसूफ याने सुसाट येत टाकसाळे यांच्या अंगावर रिक्षा घातली. टाकसाळे रिक्षाच्या खालच्या बाजूला अडकल्याने युसूफने त्यांना सुमारे २० फुटांपर्यंत फरपटत नेले. यात टाकसाळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिस मागे लागल्याचे पाहून त्याने भरधाव वेगात एका दुचाकीलाही उडविले. त्याच्या रिक्षातील एक प्रवासी रस्त्यावर फेकला गेला,
तरीही तो थांबला नाही. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पथकांना पाचारण केले. उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अंमलदार राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, विजय निकम, राजेश यमदळ, संतोष चौरे आदींच्या पथकाने युसूफला दौलताबाद भागातून बेड्या ठोकल्या. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
युसूफला आणले गुडघ्यावर
पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, वाहतूक शाखेचे एपीआय सचिन मिरधे यांच्यासह पोलिसांनी युसूफला येथेच्छ प्रसाद दिल्यानंतर रेल्वेस्टेशन चौक परिसर, बाबा चौक येथे धिंड काढून त्याचा माज उतरविला. मुजोरी करणारा युसूफला पोलिसांनी थेट गुडघ्यावर आणले.
यापूर्वीही दोनवेळा असेच प्रकार
युसूफने यापूर्वीही पोलिसांशी हुज्जत घालून अंगावर रिक्षा घातली होती. एका महिलेलाही त्याने अशाच प्रकारे अंगावर रिक्षा घालून वाद घातला होता, असे पोलिसांनी सांगितले. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे माहिती असतानाही त्याला रिक्षा चालविण्यास दिल्याने रिक्षाचा मालक मोहम्मद इब्राहिम अली अन्सारी (रा. दौलताबाद) याच्यावरही वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार झाला आहे.