Water Scarcity : पाटोदा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट झाले गडद

8 तलाव 'जोत्याखाली', 3 तलाव पूर्ण कोरडे; दहा गावात टँकर सुरू, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण
Water Scarcity
Water Scarcity : पाटोदा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट झाले गडदfile photo
Published on
Updated on

The water scarcity crisis has intensified in Patoda taluka

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : पाटोदा तालुक्यात यंदा पावसाने दीर्घ ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. उन्हाळ्याची तिव्रता वाढल्याने तालुक्यातील अनेक जलस्रोत तळ गाठत असून नागरिकांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील तीन तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून तब्बल आठ तलावांमधील पाणीपातळी 'जोत्याखाली' गेली आहे. परिणामी ग्रामीण भागात पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

Water Scarcity
Gangapur water crisis : गंगापूर तालुक्यातील तब्बल १८ गावे टंचाईग्रस्त

तालुक्यातील मंगेवाडी, इंचरणा आणि वसंतवाडी हे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तर महासांगवी, धनगरजवळका, दासखेड, पांचग्री, लांबरवाडी, भुरेवाडी, सौताडा आणि भायाळा या आठ तलावांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि हातपंपांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक ठिकाणी जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत.

पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू असून पशुधनासाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे. प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Water Scarcity
लाखो रुपयांचा खर्च करूनही उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट

पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर तालुक्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचे काटेकोर नियोजन, पाणी बचतीचे उपाय आणि आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

10 गावांमध्ये टँकर सुरू

दरम्यान, वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीची पावले उचलत तालुक्यातील 10 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. करंजवन, नफरवाडी, गवळवाडी, तळे पिंपळगाव, अंतापूर, रोहतवाडी, भायाळा, थेरला, पारनेर आणि जवळाला या तीव्र टंचाईग्रस्त गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news