

The practice of burning garbage continues in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कचरा जाळण्याचे सत्र कायम असून, जुबिली पार्क भागातील महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेजवळ कचरा पेटवून दिला जात असल्याचे समोर आले आहे. कचरा जाळण्याने निर्माण होणाऱ्या प्रदूषामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील कचरा दिवसातून दोन वेळा नियमितपणे उचलला जावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात कचरा जाळू नये याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करोडे रुपये खर्चुन जनजागृती केली जात आहे. मात्र शहरातील काही ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच - असल्याचे समोर आले आहे. यात जुबिली पार्क येथील महापालिकेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीलगत काही नागरिकांनी अनधिकृतपणे कचरा टाकण्याची जागा तयार केली आहे.
येथे नियमितपणे कचरा टाकला जातो. त्यानंतर त्याला आग लावून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळा बंद आहे. मात्र यापूर्वी शाळा सुरू असतानाही कचरा जाळल्याने विद्यार्थ्यांना धूर व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता.
आता पुन्हा कचरा जाळण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे. या भागातील कचरा दिवसातून दोन वेळा नियमितपणे उचलला गेला तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. तसेच घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडून झाडांची सुकलेली पाने घेण्यास नकार दिला जात असल्याचेही नागरिकांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.