Padegaon garbage depot : पडेगाव कचरा डेपोसमोर ठाकरे सेना-वंचितचा रास्ता रोको

आठ दिवसांपासून धुमसणारी आग विझविण्यात मनपा अपयशी. डेपोला टाळे ठोकण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
Padegaon garbage depot
Padegaon garbage depot : पडेगाव कचरा डेपोसमोर ठाकरे सेना-वंचितचा रास्ता रोको file photo
Published on
Updated on

Thackeray Sena and Vanchit stage 'Rasta Roko' protest in front of Padegaon garbage depot

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राबाहेर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लागलेली आग आठ दिवस उलटूनही पूर्णपणे विझलेली नसल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सतत पसरत असलेल्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

Padegaon garbage depot
जालन्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात ठाकरे सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी (दि.१७) सकाळी कचरा डेपोसमोर जोरदार आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला.

पडेगाव कचरा डेपोमध्ये ७ मेपासून आग धुमसत आहे. दररोज अग्निशमन विभागाच्या दोन ते तीन गाड्यांकडून पाण्याचा सतत मारा केला जात असला, तरी आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

Padegaon garbage depot
विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार !

शहरातील तीन झोन कार्यालयांमधील कचरा या केंद्रावर टाकण्यात येतो. प्रक्रिया न झालेला कचरा आणि पूर्वीच्या कचरा कोंडीच्या काळातील मोठमोठे ढीग अजूनही डेपोमध्ये साचून आहेत. मात्र कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया राबविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी कचऱ्याचे ढीग कमी झाले नसल्याचे वास्तव आहे. तसेच सध्या शहरातील तापमान ४२ अंशांच्या पुढे गेल्याने कचरा डेपोच्या बाहेरील भागातील कचऱ्याने अचानक पेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र आठवडाभर सतत पाण्याचा मारा करूनही आग वारंवार भडकत असल्याने महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धुरामुळे पडेगाव परिसरात सकाळ-संध्याकाळ प्रदूषणाची दाट चादर पसरत आहे. यामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास आणि घशात खवखव जाणवत आहे. चार ते पाच नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. दरम्यान महापालिकेच्या निष्काळजी कारभाराविर ोधात ठाकरे सेना व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी रविवारी सकाळी आंदोलन छेडत कचरा डेपोसमोर रास्ता रोको केला.

यावेळी कचरा डेपो बंद करा, जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, दादागिरी नही चलेगी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या आंदोलनात ठाकरे सेनेचे मनपा गटनेते गणेश लोखंडे, नगरसेविका सावित्री वाणी, बाळासाहेब शेलार, मुरलीधर लोखंडे, संदीप पिवळे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेविका करुणा जाधव, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, भावी गवई, सतीश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पडेगावकरांचा वाढला संताप

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुरामुळे पडेगाव परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरात बसणेही कठीण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून केवळ पाण्याचा मारा करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे.

अन्यथा डेपोला ठोकणार टाळे

आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आग विझविण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा. अन्यथा डेपोला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news