

The plan of municipal ward structure was wrong
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसंदभनि तयार करण्यात आ-लेला प्रभाग रचनेचा ६ व ७ ऑगस्ट रोजी सादर करण्यात आलेल्या या आरखड्यात नैसर्गिक सीमांकन चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले होते. यासह काही बाबी चुकीच्या असल्याचे निर्देशनास आल्याने नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर अवघ्या पंधराच दिवसांत त्यात दुरुस्ती करून गुरुवारी (दि.२१) पुन्हा नव्याने प्रभाग रचना सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करून राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश मनपाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने ११५ वॉर्डाची प्रभाग रचना करून चार सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे २८ तसेच तीन सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे २९ प्रभाग तयार केले. ही प्रभाग रचना तयार केल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी ६ व ७ ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाकडे या प्रभागरचनेचे सादरीकरण केले.
हे सादरीकरण बघितल्यानंतर नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. या प्रभाग रचनेत नैसर्गिक सीमांकन चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आले होते. तसेच प्रगणक गटाची मांडणी योग्य पध्दतीने केलेली नव्हती, तर दहा टक्के कमी अधिक लोकसंख्याचे प्रमाण ठेवण्यात आलेले नव्हते. ही प्रभाग रचना राजकीय पक्षांना फायदेशीर ठरणार असल्याच्या दृष्टीने तयार करण्यात आल्याचे ताशेरे नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओढले. त्यामुळे प्रभाग रचनेचे पूर्ण सादरीकरण न पाहताच मनपा अधिकाऱ्याला परत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा प्रभाग रचना तयार करण्यासाठी नगररचना विभागातील अधिकारी आणि मनपाचे वरिष्ठ अभियंते यांना कामाला लावून अवघ्या पंधरा दिवसांत नव्याने प्रभागरचना तयार केली. त्यानंतर गुरुवारी मुंबई मंत्रालयात पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचे सादरीकरण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.