

ST is losing Rs 2 crore every day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. प्रवासी घटल्याने, एसटीचा तोटाही वाढत चालला आहे. राज्यभरात एसटीला प्रतिदिवस २ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. एकीकडे तोटा वाढला तर दुसरीकडे एसटीचा खर्चही वाढला आहे. एसटीचा संचित तोटा १ हजार कोटीवर पोहोचल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष माधव कुसेकर यांनी दिली.
कुसेकर यांनी एसटीच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. एसटीने गेल्या सात वर्षात नवीन बस खरेदी बंद केली होती. त्यामुळे दहा वर्षांपेक्षाही जास्त वयोमान झालेल्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या दुरुस्तीवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. सध्या ऑफ सिझन असल्याने प्रवासी संख्याही घटली आहे. त्यामुळे उत्पन्नातही घट होत आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या देयकांपासून ते इतर महत्वाच्या कामांवर झाला आहे. एसटीच्या भविष्य निर्वाह निधीचे देयक शंभर कोटीपर्यंत पोहोचले होती, असेही त्यांनी सांगितले.
एसटीला होणार तोटा भरून काढण्यासाठी आम्ही शासनाकडे मदत मागितली आहे. शासन विविध योजनेअंतर्गत मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ही बाब मान्य झाल्यानंतर मात्र एसटीचा आर्थिक डोलारा समतोल होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधन तसेच अन्य यात्रा व जादा गाड्यांच्या वाहतुकीत एसटीला चांगले उत्पन्न मिळाले आहे, ही एसटीची जमेची बाजू आहे. आगामी काळात प्रवासी वाढविण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जात आहेत, अशीही माहिती कुसेकर यांनी दिली.
पंधरा रुपये प्रतिकिलोमीटर तोटा
एसटी विभागाने ईव्ही बस भाडेतत्वार घेतलेल्या आहेत. एसटीला ५१५० ईव्ही बस मिळणार होत्या. यापैकी फक्त ४५० बस आतापर्यंत मिळाल्या आहेत. आगामी काळात या बसचाही पुरवठा वाढणार आहे. या बसचा एसटीला प्रतिकिलोमीटर १५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तो भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही कुसेकर यांनी सांगितले.