

The owner, with the help of the driver, stole back the sand-laden truck that had been seized by the Tehsildar
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
गंगापूरच्या तहसीलदारांनी पकडलेला अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक मालकाने चालकाच्या मदतीने पळवून नेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री आसेगाव गोकुळवाडी रस्यावर घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड, ग्राम महसूल अधिकारी दीपाली गुल्हाणे, कुंदन जारवाल यांचे पथक २५ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास आसेगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी पथकाला आसेगाव शिव-ारातील गट क्रमांक १०४ गोकुळवाडी रोड फतियाबाद येथे विनाक्रमांकाचा हायवा माती मिश्रित वाळू वाहतूक करताना दिसून आला.
पथकाने सदरील हायवा थांबवून चालकास गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्याची परवानगीबाबत विचारणा केली असता त्याने काही एक सांगितले नाही व पथकासमोर मालकाला फोन करून आपली गाडी गंगापूरच्या तहसीलदारांनी पकडली असून, तुम्ही तात्काळ इकडे या, असे कळविल्यानंतर स्कॉर्पओ (एमएच २०, जीएम-८६८६) जीप मधून आलेल्या इसमाने हा हायवा माझा आहे, असे सांगितले.
यावेळी तहसीलदार वगवाड यांनी त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख अनिस असे सांगितले. दरम्यान, वगवाड यांनी त्यास हायवा रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले असता हायवा व स्कॉर्पिओ घेऊन दोघे तेथून पसार झाले. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी दीपाली गुल्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंबरवर खाडाखोड
कारवाईच्या कचाट्यात सापडू नये यासाठी वाळूमाफियांकडून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या हायवाच्या नंबर प्लेटची खाडाखोड तसेच विनाक्रमांकाच्या हायवाचा वापर केला जातो. वाळूज एमआयडीसीत राजरोसपणे रस्त्यावरून धावत असतात.