

The mystery of the girl's death by drowning in a well remains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
पिसादेवीतील ओंकार सिटी बांधकाम साईटवरून बेपत्ता झालेल्या साडेपाच वर्षांच्या राशी शिनू चव्हाण हिचा मृतदेह चौथ्या दिवशी ४०० मीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत शुक्रवारी (दि.१४) तरंगताना आढळला. दरम्यान, पोस्टमार्टम अहवालात मुलीचा मृत्यू ड्रॉव्हनिंग (पाण्यात बुडून) झाला असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी दिली. मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचे किंवा दुखापतीच्या खुणा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राशी विहिरीपर्यंत गेली कशी याचे गूढ कायम आहे.
मध्यप्रदेशातील दाम्पत्य ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करते. त्यांची मुलगी राशी ही ११ नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर चिकलठाणा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पथकांनी परिसरातील सर्व विहिरी, तलाव, जागोजागी झाडाझुडपे, ओसरी, शेतमळे याठिकाणी शोध घेतला.
अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. या विहिरीतही पोलिसांनी शोध घेतल्याचे सांगितले होते. शुक्रवारी त्याच विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह सापडलेली विहीर रस्त्यापासून ३० फूट आत, झाडाझुडपांच्या आड दडलेली असून तिच्याभोवती अंदाजे ३ फूट उंच कठडे आहेत. त्यामुळे एवढ्या उंच कठड्यावरून चिमुकली विहिरीत पडली की घातपात झाला, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याशिवाय विहिरीवर सुरक्षा जाळी नव्हती. राशीला पेरू खाण्याची आवड होती; ती नेहमी शेतातून पेरू तोडून फॉकमध्ये भरून आणत असे, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पेरू आणण्यासाठी शेताकडे गेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
चिमुकली विहिरीपर्यंत गेली कशी ?
मुलगी शेतातील विहिरीपर्यंत कशी पोहोचली, पडताना कोणी पाहिले का? विहिरीचा उंच कठडा असूनही ती आत कशी पडली? ती एकटीच शेताच्या दिशेने गेली की कुणी तिला तिकडे नेले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दरम्यान, पोलिस विविध बाजूंनी तपास करत आहेत, असे निरीक्षक दरवडे यांनी सांगितले.