

सिल्लोड तालुक्यात हरभऱ्याची सर्वाधिक ११,२४२ हेक्टरवर पेरणी, त्यापाठोपाठ गहू व मका पिकांची मोठी लागवड झाली.
खरीप नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बीकडे मोठ्या आशेने वळत टोकन यंत्राचा व्यापक वापर केला.
टोकन यंत्रामुळे मजुरीवरील खर्च कमी होऊन अल्प वेळेत मोठ्या क्षेत्राची पेरणी पूर्ण झाली.
योग्य खोली व समान अंतराने बियाणे पडल्याने पिक व्यवस्थापन सुलभ होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत.
प्रा. मन्सूर कादरी
सिल्लोड यंदा चांगल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यात रब्बी हंगाम उत्साहात सुरू असून, २७ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. टोकन यंत्रामुळे बियाणे योग्य खोलीवर व समान अंतराने पडत असल्याने पीक व्यवस्थापन सुलभ होत आहे.
शेतकऱ्यांनी हरभरा या पिकाला सर्वाधिक पसंती दिली असून, ११ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गहू ८ हजार ६८० हेक्टर क्षेत्रात तर तिसऱ्या क्रमांकावर मका ७ हजार १३ हेक्टर क्षेत्रात पिकाची लागवड झाली आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीकडे आशेने वळत टोकन यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.
८० ते ९९ टक्के पेरणी शेतकऱ्यांनी टोकन यंत्राच्या मतातून माध्यमातून केल्याने शेतकऱ्याचा मजुरीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, कमी वेळेत अधिक क्षेत्रात पेरणी पूर्ण होण्यास मदत झाली आहे. टोकन यंत्रामुळे बियाणे योग्य खोलीवर व समान अंतराने पडत असल्याने पीक व्यवस्थापन सुलभ होत आहे.
हाताने चालविणारे तसेच ट्रॅक्टरचलित अशी दोन्ही प्रकारची टोकन यंत्रे उपलब्ध असून, ४ ते ५ एकर क्षेत्र एका दिवसात येण्याची क्षमता या यंत्रांमध्ये आहे. तसेच बियाणे आणि खत एकत्र टाकण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने तंत्रशुद्ध पेरणीला चालना मिळत आहे.
यंत्र खरेदीसाठी अनुदान
तांत्रिकदृष्ट्या अचूक पेरणी, कमी बियाणे खर्च, मजुरीची बचत आणि उत्पादन वाढ यामुळे टोकन पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, यंत्र खरेदीसाठी साठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध आहे. सिल्लोड तालुक्यात सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरूच असून, त्या विशेषतः गव्हाची पेरणी मोठ्याप्रमाणात सुरूच असून, उपलब्ध पाणीसाठा पाहता रब्बी हंगाम गतवर्षीपेक्षा विक्रमी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे