

The Kohinoor chairman also cheated the Open University
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
खुलताबाद येथील कोहनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान या महाविद्यालयाचे अध्यक्ष खान महमद मजहर अन्वर व सचिव खान अस्मा महमद मजहर यांनी स्वतःचे हिंदीचे पेपर दुसऱ्यांकडून लिहून घेत मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिल्याचे चौकशी समितीत पुढे आले. या समितीच्या अहवालानंतर मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील सहायक कक्ष अधिकारी सतीश रामचंद्र बोरसे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ मध्ये पुर-वणी परीक्षा घेण्यात आली. या परी क्षेसाठी खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान या महाविद्यालय परीक्षा केंद्र होते. या केंद्रात या महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष खान महमद मजहर अन्वर व सचिव खान अस्मा महमद मजहर हे एम. ए. हिंदी विषयाचे परीक्षार्थी होते.
या दोघांनी त्यांचे पेपर स्वतः न लिहिता महाविद्यालयातील शिक्षक फिरोज खान व बाळू भोपळे यांच्याकडून लिहून घेतले. तसेच त्यांना शेख बादशाह व परीक्षा प्रमुख शेख लईख यांनीही मदत केली. या तक्रारीनंतर मुक्त विद्यापीठाने त्रीसदस्यीय सत्यशोधन समिती गठित केली होती. या समितीत हे सहा जण दोषी आढळून आले.
दरम्यान, स्वतःचा पेपर दुसऱ्याकडून लिहून घेणे, तसेच त्याला तेथील केंद्र प्रमुखांनी मदत करणे आदी गंभीर प्रकारांची दखल घेत या समितीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सतीश बोरसे यांच्या तक्रारीवरून खान महम्मद मजहर अन्वर, खान अस्मा महमद मजहर, फिरोज गफार शेख, बाळू भागवानराव भोपळे, शेख बादशहा व शेख लईख महेमूद आदी सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.