

Preparations for ZP elections begin, group and group formation program announced
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग या दृष्टीने तयारीला लागले असून त्यांच्याकडून गट व गणांच्या रचनेचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.१३) जाहीर करण्यात आला. यानुसार १४ जुलैपर्यंत गट-गणांच्या रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ रोजी संपलेला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आहे. गेल्या आठवड्यात महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेबाबत अध्यादेश निघाल्यानंतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्या निवडणुकांकडे लक्ष लागले होते. दरम्यान, राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता गट-गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
विशेषतः ही प्रक्रिया लक्षात घेता, दीपावलीनंतरच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६२ गट आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या १२४ गणांमधील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत.
साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असून, प्रशासकराज आहे. त्यामुळे त्यात्या मतदारसंघातील अगोदर असलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय वजन कमी झाले. तेथील राजकीय समीकरणेही बदलून गेल्यामुळे प्रस्थापितांचा पुन्हा नव्याने तेथे जम बसविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्का बसणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
गट-गण रचनेची जिल्हाधिकारी यांनी १४ जुलैपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करणे, २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे, प्राप्त झालेल्या हरकतींच्या आधारे अभिप्रायासह २८ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करावा, तर विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन ११ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.