

The inquiry team arrived and began examining the files
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) शहरात दाखल झाले आहे. या पथकाने सोमवार (दि. २२) पासून छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांतील १० हजार ६० शिक्षकांच्या शालार्थ आयडीची तपासणी सुरू केली आहे. हे पथक तब्बल आठवडाभर इथे तळ ठोकून असणार आहे.
नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरीत्या समाविष्ट करून वेतन अदा केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली.
चौकशी पथक राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करत आहे.
२०१२ पासून ते आजतागायत प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देशही पथकाला देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत २०१९ पासून आतापर्यंत एकूण १० हजार ६० शिक्षकांच्या शालार्थ आयडीला मान्यता देण्यात आलेली आहे. या सर्व शिक्षकांच्या संचिका पडताळणीसाठी उपसंचालक कार्यालयात मागवून घेण्यात आल्या आहेत. एसआयटीचे पथक सोमवारी शहरात दाखल झाले. या पथकातील सदस्यांकडून प्रत्येक संचिका पडताळणी करण्यात येत आहे. नियुक्तीची कागदपत्रे आहेत का, निवड कशी झाली आदी बाबींची खातरजमा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली असे जिल्हे येतात.
कोरोनातही शालार्थ आयडी
मराठवाड्यात बीड, लातूर अशा अनेक जिल्ह्यांतही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिल्या गेल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी दिल्याचे समोर आले आहे. या काळात प्रत्यक्ष शाळा सुरू नव्हत्या. कार्यालयांसाठीही कोरोनाकाळात निर्बंध होते. तरीही विभागात उपसंचालक कार्यालयाकडून सुमारे चार हजार शालार्थ आयडी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.