

The history of the heritage sites in Himayat Bagh will be conveyed to the citizens
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हिमायत बागेतील ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळांचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ५०-५० नागरिकांचे गट तयार करून वारसा फेऱ्यांचे आयोजन करण्याची सूचना रविवारी (दि. २७) हेरीटेज वॉकदरम्यान महापौर समीर राजूरकर यांनी केली. समर पॅलेस, बारादरी, शक्कर बावडी, चांदणी चबुतरा, नहर आदी स्थळांचा नागरिकांनी प्रत्यक्ष अभ्यास करावा, यासाठी आगामी काळात अशा फेऱ्या घेण्यात येणार आहेत.
महापालिका आणि इंटॅच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हिमायत बागेत वारसा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, माजी खासदार इम्तियाज जलील, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता सचिन वायकर, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ, इंटॅचचे पदाधिकारी, नागरिक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वास्सा फेरीदरम्यान इंटॅचच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना हिमायत बागेतील समर पॅलेस, बारादरी, नहरी, ऐतिहासिक झाडे, नदीकाठ आणि कारंजे आदी ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा स्थळांची माहिती दिली. तसेच संबंधित स्थळांचा इतिहास आणि त्यांचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
दरम्यान, हिमायत बागेच्या परिसरात लवकरच मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. शहराला हिमायत बागेच्या रूपाने महत्त्वाचे ऑक्सिजन हब आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
त्याच्या जतनासाठी नागरिकांनीही सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह सकाळी आणि सायंकाळी हिमायत बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी परिसरातील नशेखोरीसह अन्य गैरप्रकारांकडे लक्ष ठेवावे. असे प्रकार आढळल्यास त्याची माहिती पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आयुक्त येडगे यांनी केले.