

The Eicher truck carrying the animals was seized.
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका आयशरमध्ये कोंबून नेत असलेली जनावरे गोवंशाची असल्याच्या संशयावरून एका महिला गोरक्षकासह आठ जणांनी पाठलाग करून पकडली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) रात्री बाराच्या सुमारास तालुक्यातील सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील भराडीजवळ करण्यात आली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेत जनावरांसह आयशर जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान या कारवाईनंतर गोरक्षक पोलिसांसह बोरगाव फाट्यावर एका शेडमध्ये बांधलेली जनावरे पाहण्यासाठी गेले असता तेथे जमलेल्या जमावाने गोरक्षकांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला होता.
गोरक्षक नयना राजपूत (रा. छत्रपती संभाजीनगर) आपले सहकाऱ्यांसोबत मिळालेल्या माहितीवरून बोरगाव फाट्यावर लक्ष ठेवून होते. या दरम्यान आयशर (एमएच- २०, जीसी ८६२८) मध्ये जनावरे कोंबली व सिल्लोडच्या दिशेने निघाला. गोरक्षकांनी पाठलाग करून आयशर भराडीजवळ पकडला व ही माहिती ११२ नंबरला कॉल करून वरिष्ठ पोलिसांना कळवली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे पोलिस कर्मचारी यतीन कुलकर्णी, विष्णू कोल्हे यांनी धाव घेत जनावरांसह आयशर जप्त केला व दोघांना ताब्यात घेतले.
बोरगाव फाट्यावर एका शेडमध्ये कत्तलीसाठी जनावरे कोंडलेली असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांनी दिली. गोरक्षक व पोलिसांनी रात्रीच बोरगाव फाटा गाठला. तर या ठिकाणी काही जनावरे बांधलेली होती. जनावरे शेतकऱ्यांची असल्याचे काही जमलेले नागरिक पोलिसांना सांगत असताना या दरम्यान जमाव जमला. जमाव व गोरक्षकांमध्ये वाद झाला. तर अंधाराचा फायदा घेत काही नागरिकांनी गोरक्षकांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला होता.
मात्र या दरम्यान ११२ नंबरच्या माहितीवरून शहर, वडोदबाजार, अजिंठा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही पोहोचले व जमाव पांगला. या प्रकरणी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात इरफान शेख मेहमूद (३७, रा. ईदगाहनगर, सिल्लोड), इम्रान शेख हनिफ (३०, रा. बोरगाव सारवणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार यतीन कुलकर्णी करीत आहेत.
जनावरे इब्राहिमपूरच्या गोशाळेत
पोलिसांनी आयशर गाडी, आठ जनावरे (बैल) असा १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर दोघांना ताब्यात घेतले. तर शुक्रवारी पोलिसांनी आयशरमधील आठ जनावरे इब्राहिमपूर (ता. भोकरदन) येथील गौशाळेत पाठवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शुक्रवारी सकाळीच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी कर्मचाऱ्यांसह ग्रामीण पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.