

The drug dealer has been arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात अंमली पदार्थांची विक्री वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक पथकाने कारवाई सुरू केली आहे. रविवारी (दि. २८) रेल्वेस्टेशन परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास सिल्क मिल कॉलनी येथील हमालवाडा येथे पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
शेख मिजान शेख नईम (२७, रा. सिल्क मिल कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ०.८९ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक महागडा आयफोन जप्त करण्यात आला असल्याची माहिती एपीआय रविकांत गच्चे यांनी सोमवारी (दि.२९) दिली.
अधिक माहितीनुसार, एनडीपीएस पथकाने सापळा लावल्यानंतर पोलिस कारवाईची चाहूल लागताच शेख मिजानचा साथीदार कैफ कुरैशी (रा.रोशनगेट) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. प्राथमिक चौकशीत हा ड्रग्जचा साठा मस्तान आरीफ (रा. भिवंडी, मुंबई) याच्याकडून आणल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, लालखा पठाण, नवाब शेख, नितेश सुंदर्डे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, काळे यांच्या पथकाने केली.
आरोपीवर अनेक गुन्हे
आरोपी शेख मिजान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर सातारा, क्रांती चौक आणि जालना जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे आणि अंमली पदार्थ विक्रीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.