

The condition of small and medium projects in the taluka is worrying due to lack of rain.
वैजापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी बहुतांश भागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील ९ लघु, मध्यम प्रकल्पाची अवस्था भर पावसाळ्यात चिंताजनक बनली आहे. काही प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. तर काही प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रातील लहान, मोठे प्रकल्प तहानलेले आहेत. पावसाअभावी तालुक्यातील बोर दहेगाव प्रकल्प अजूनही कोरडेठाक पडले आहेत. कोल्ही ५५.७८ टक्के, बिलोनी उपयुक्त साठा शून्य, खंडाळा ५९ टक्के, सटाना ३३.१३ टक्के, जरुळ उपयुक्त साठा शून्य आहेत. केवळ मन्याड साठवण तलावत १०० टक्के जलसाठा आहे.
गाढे पिंपळगाव ५५.९८ टक्के व वैजापूर शहराची तहान भागवणाऱ्या नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पात २.७३ टक्के असा जेमतेम पाणीसाठा आता शिल्लक राहिला असून, प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागीलवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ झाली होती. परंतु, यावर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिना सुरू झाले तरी मोठ्या पावसाने तालुक्यात अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे आवश्यक आहे. लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला तरच रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.
जलयुक्त शिवार कोरडे
वैजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मागील तीन वर्षांत ठिकठिकाणी काम करण्यात आले. सिमेंट नाल बांध बांधले आहेत. सध्या पाऊस नसल्यामुळे जलयुक्तच्या कामात पाणीसाठा झाला नाही. सगळे सीएनबी कोरडे असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके ऐन जोमात व फुलोऱ्यात असताना ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
उगवणारा दिवस कोरडाच
यंदा ऑगस्टचा पहिला आठवडा उलटून गेला तरी बोर दहेगाव मध्यम प्रकल्प कोरडाठाक आहे जो तो उगवणारा दिवस कोरडाच जाऊ लागल्याने शेतकरी हैराण झाला आहे. पावसाने दडी मारल्याने वाऱ्याच्या झुळुकीवर डोलणारी पिके आता सुकू लागली आहेत. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास हलक्या जमिनीवरची पिके तर पार करपून जाण्याची शक्यता असून सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरलेले मका, कपाशी, सोयाबीनचे पीक पाऊस बेपत्ता झाल्याने धोक्यात सापडले आहे.