

Six arrested in ATM fraud case of Rs 1.16 crore
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या सिक्युअर व्हॅल्यू कंपनीतील शाखाप्रमुख, लेखा परीक्षकसह ८ एटीएम ऑफिसर्सनी मिळून एक कोटी १६ लाख ८० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार मार्च २०२२ रोजी समोर आला होता. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबासाहेब अंभुरे आणि अविनाश पडूळ या दोघांना अटक करण्यात आली होती. तर तेव्हापासून फरार असलेल्या अन्य सहा आरोपींना गुन्हे शाखेने सुमारे चार वर्षांनंतर गुरुवारी (दि.४) अखेर बेड्या ठोकल्या.
अमित विश्वनाथ गंगावणे (३५), अनिल अशोक कांबळे (३५), योगेश पुंजाराम काजळकर (३७, तिघेही रा. भावसिंगपुरा), सिद्धांत रमाकांत हिवराळे (२७, रा. भीमपुरा, उस्मानपुरा), सचिन एकनाथ रंधे (३२, रा. राजनगर, हसूल) आणि संजय भालचंद्र जाधव (४४, रा. बजाजनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी रमेश साठे (रा. औरंगपुरा) हे सिक्युअर व्हॅल्यू इंडिया या कंपनीत उपशाखाधिकारी आहेत. कंपनीकडे वेगवेगळ्या बँकेचे एटीएममध्ये कॅश भरण्याचे कंत्राट होते. या कंपनीचे सिडको येथील कार्यालयात शाखाधिकारी म्हणून बाबासाहेब शामराव अंभुरे होते. ५ मार्च २०२२ रोजी रूट क्र. १ ते ७ चे लेखापरीक्षण करण्यात आले. तेव्हा एटीएममध्ये १ कोटी १६ लाख ८० हजार २०० रुपये कमी असल्याचे समोर आले.
चौकशी सुरू केली तेव्हा एटीएम ऑफिसर योगेश काजळकर, सचिन रंधे, अविनाश पडूळ, सिद्धांत हिवराळे, अमित गंगावणे, अनिल कांबळे यांनी रक्कम कमी भरल्याचे समोर आले. त्यानंतर शाखाप्रमुख बाबासाहेब अंभुरे यांच्या सांगण्यावरून आणि लेखापरीक्षक संजय जाधव यांनाही प्रकार माहिती असल्याचे आरोपींनी कबूल केले होते. त्यावरून या आठ जणांनी मिळून अपहार केल्याचा ठपका ठेवून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एपीआय ज्ञानेश्वर अवघड यांनी तपास करून अंभुरे आणि पडूळ यांना अटक केली होती. दोघेही आता जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, उर्वरित सहा जण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर, सिद्धार्थ थोरात, शैलेश आस्कर, यशवंत गोबाडे, अमोल मुगळे, संतोष चौरे, संजीवनी शिंदे यांनी केली.
रक्कम कमी, रिपोर्ट मात्र फुल कॅश
आरोपींनी प्रत्येक वेळी संबंधित बँकेचे एटीएममध्ये रक्कम भरताना १ ते २ लाख रुपये हडप केले. मात्र रक्कम पूर्ण भरल्याचे एटीएमला खोट्या नोंदी, मशीनमध्ये कॅश बॅलेन्स रिपोर्ट खोटे तयार केले. हा प्रकार २०२१ ते २०२२ या वर्षभरात या टोळीने केला होता.
व्यवसाय थाटून घरीच मुक्काम
आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून काही दिवस भूमिगत झाले. पोलिसांनीही शोध थांबविल्यानंतर आरोपींनी चक्क आपापले छोटे-मोठे व्यवसाय थाटून कामधंदा सुरू केला होता. काही जण दुसऱ्या बँकांमध्ये काम करत होते. गुन्हे शाखेने पकडले तेव्हा सर्वजण स्वतःच्या घरीच असल्याचे समोर आले.