

The city is filled with devotion with the chants of Hare Ram Hare Krishna.. ISKCON Shri Jagannath Rath Yatra
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जय जगन्नाथ, हरे रामा हरे कृष्णा... कृष्णा कृष्णा हरे हरे... चा गजर करत शेकडो भाविकांनी गुरुवारी (दि.१६) इस्कॉनचा श्री जगन्नाथाचा रथ ओढत सहभाग घेतला. महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे, जगन्नाथपुरी (ओडिशा) येथे आजच्याच दिवशी रथयात्रा सुरू झाली.
ओडिशाप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) च्या मधुबन केंद्राच्या वतीने आषाढ शुद्ध द्वितीयेला दरवर्षी भगवान जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात काढली जाते. भगवानांची कृपा प्राप्त व्हावी या भावनेने मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
दुपारी ३ वाजता शहागंज येथून श्री जगन्नाथ, श्री बलदेव आणि देवी सुभद्रा यांच्या अर्चाविग्रहांना आकर्षक सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आल्या. इस्कॉनच्या रथयात्रेतही शेकडो नागरिक सहभागी झाले होते. जागोजागी नागरिकांनी रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली. "हरे कृष्ण, हरे कृष्ण..." या महामंत्राच्या गजरात कीर्तन, भजन आणि भक्तिमय नृत्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रथयात्रेत प्रमुख पाहुणे म्हणून महापौर समीर ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, किशोर शितोळे आदींची उपस्थिती होती.
भगवानांची आरती करून इस्कॉन पुणे येथून आलेले जीवदया प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा सुरू झाली. भाविकांनी रथमार्गाची स्वच्छता राखत संपूर्ण मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजविला. एका बाजूने महिला व एका बाजूने पुरुषांनी रथ ओढला. शहागंजमार्गे सिटी चौक, गुलमंडी सराफा,, गुलमंडी, संभाजीपेठ, नागेश्वरवाडी, निराला बाजार, समर्थ नगर, भाग्यनगरमार्गे ही रथयात्रा अदालत रोडवरील इस्कॉन मधुवन केंद्र येथे पोहचली.
रथयात्रेदरम्यान संपूर्ण मार्गावर हरिनाम संकीर्तन, भजन, महाप्रसाद वितरण सुरू होते. रथयात्रेनंतर मार्ग स्वच्छ करण्यात आला. रथयात्रेचा समारोप इस्कॉन मधुबन केंद्र येथे झाला. यावेळी भगवान जगन्नाथांचे विशेष शृंगार दर्शन, महाआरती, छप्पन भोग आणि सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह विविध सामाजिक व धार्मिक संस्थांनी यावेळी सहकार्य केले. यावेळी इस्कॉनचे विनोद बगडिया, राजेश मेहता, अनिल गायकवाड, अभिषेक कादी, किशोर शितोळे, माधव मुंडे, कैलाश खंडेलवाल, सचिन खंडेलवाल, भारत पगारे आदी उपस्थित होते.