Maha ShivRatri | लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा!

भाविकांची अलोट गर्दी, मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून संपन्न झाला रथोत्‍सव, हर हर महादेवचा जयघोष
Maha ShivRatri
लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा!
Published on
Updated on

औंढा नागनाथ : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून भव्य रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . तत्पूर्वी दुपारपासून नगरपंचायत औंढा नागनाथ व नागनाथ संस्थान कडून भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

हर हर महादेव, नागनाथ महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता रात्री दहा वाजता सुरू झालेला हा रथोत्सवाचा सोहळा तब्बल सव्वा तास चालला .अनन्य साधारण महत्व असलेल्या येथील रथोत्सवाला पंचकोशीतील भाविकांसह जिल्हाभरातून व राज्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित झाले होते. यामुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजल्यापासून मंदिर परिसरामध्ये भक्तांची मांदियाळी दिसून आली.

प्रारंभी इतिहासातील दुर्दैवी घटना म्हणजेच 12 मार्च 48 रोजी रथोत्सवाच्या वेळीच बॉम्बस्फोटामध्ये रामचंद्र पाठक, गणपत ऋषी आणि रंगनाथ सुरवाडकर यांना वीर मरण आले होते, तसेच 23 फेब्रुवारी 2012 रोजी रथ प्रसंगीच सतीश पाठक यांच्या अंगावरून रथ गेल्यामुळे दुर्दैवी दुर्घटना घडली होती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष श्रद्धांजली वाहून रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. मंदिर परिसराला पाच प्रदक्षिणा घालण्यासाठी सव्वा तास वेळ लागला. संस्थान अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे यांच्या विशेष मार्गदर्शनामध्ये अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ आणि सुरक्षा रक्षक प्रमुख बबन सोनवणे यांनी रथोत्सवाचे विशेष व्यवस्थापन केले.

रथोत्सवासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता औंढा नागनाथ पोलिसांकडून पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. जीएस राहिरे यांनी आपल्या सर्व लवाजम्यांसह, एसआरपीची तुकडी ,बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या सहकार्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष परिश्रम घेतले. दुपारी मंदिर परिसरामध्ये संस्थान कडून ठेवण्यात आलेल्या महा प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

नागनाथ संस्थान व नगरपंचायत च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या भव्य कुस्तीच्या दंगलीमध्ये निशाणा येथील स्वप्निल सावळे यांना प्रथम पारितोषिक व मानाची गदा नगराध्यक्ष , उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी सन्मानाने सुपूर्द केली. सावळे यांनी वाशिमच्या शेख मेहबूब पैलवान यांचा सरळ पराभव केला. भव्य कुस्त्यांची दंगल चालू असताना आ. संतोष बांगर यांनी उपस्थित मल्लांवर बक्षीसांची लयलुट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news