

The brother of the cannibal Babla escaped from Harsal prison
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याचे पोट फाडणाऱ्या कुख्यात बबला टोळीतील सदस्य आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी शेख अमजद असद ऊर्फ मोहसीन (४५, रा. जहांगीर कॉलनी) याने रविवारी (दि.८) दुपारी १ वाजेच्या सुमारास हर्सल खुल्या कारागृहातून पलायन केले. यामुळे एकच खळबळ उडाली असून, हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या माहितीला कारागृह अधीक्षकांनी दुजोरा दिला आहे.
कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अमजद असद हा अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात २०१८ साली अटक झाला होता. त्यानंतर त्याला २०२० साली जन्मठेपेची शिक्षा लागली होती. तो अमरावती कारागृहात होता. तेथून जुलै २०२४ रोजी त्याला हर्मूल कारागृहात स्थलांतरित करण्यात आले होते. त्याच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्यास खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
त्याच्याकडे साफसफाईचे काम होते. दरम्यान, रविवारी दुपारी त्याचा कोणाशीतरी चांगलाच वाद झाला. त्यानंतर त्याने संधी साधून खुल्या कारागृहातून दुपारी १ वाजेच्या सुमारास पलायन केले. ही बाब कारागृहातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर कारागृहाच्या वतीने हसूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
'त्या' क्रूर हत्येचा थरार
३० वर्षीय प्लॉटिंग व्यावसायिक शेख जब्बार या तरुणाचे १६ मे २०१८ रोजी शेख वाजेद ऊर्फ बबला, बाबा लोली, अलीम, शेख अमजद, सिकंदर व इतर दोघांनी बिस्मिला कॉलनी येथील खाम नदीजवळ बेदम मारहाण करून अपहरण केले होते. त्यानंतर शेख जब्बार यांची दौलताबाद परिसरात हत्या करून बबलाने जब्बार यांचे पोट फाडून मृताचे अवयव काढल्याने बबला नरभक्षक असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जब्बार यांच्या पोटात दगड टाकून तो मृतदेह पाण्यात फेकला होता. पोलिसांनी बबलासह त्याच्या टोळीला अटक केली होती. २०२० साली बबलासह चार जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.