

The body of little Shyam was found in the canal
पाचोड, पुढारी वृत्तसेवा : नांदर (ता. पैठण) ग्रामस्थांना एकच प्रश्न... एवढी निरागस, फुलांसारखी दोन मुलांबाबत असे का घडले ?. त्यातच आता दुसऱ्या चिमुकला श्यामचा मृतदेह सापडल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे. पोटच्या दोन निष्पाप मुलांना चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे याने जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याची घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे सोमवारी (ता. १६) रात्री सात वाजेच्या सुमारास घडली होती.
आयुष ऊर्फ आर्यन रोडगे (वय ७) याचा मृतदेह बुधवारी (ता. १८) सकाळी डाव्या कालव्यात सापडला होता. त्याच दिवशी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी (ता. १९) सकाळी विहामंडवा जवळील रामनगर, नवगाव १० नंबर चारी येथे टाकळी पुलाजवळ दुसरा चिमुकला श्याम याचा मृतदेह पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसला. सायंकाळी श्यामवर अंत्यविधी करण्यात आला. मुलांच्या अंत्यसंस्कारावेळी माझ्या बाळाला उठव, माझं बाळ मला परत द्या म्हणून आईचा हंबरडा ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. आजोबांनी तर नातवाला छातीशी कवटाळून टाहो फोडला.
पोलिसांनी संशयित पिता सोमनाथ दामोदर रोडगे (वय ४०) याला घटनेच्या पहिल्याच दिवशी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने पती-पत्नीत मुलांच्या संगोपनावरून नेहमी वाद होत असल्याचे सांगितले. त्याच रागातून दोन्ही मुलांना संपवल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीचाही जीव घेण्याचा विचार होता, मात्र ती सोबत न आल्याने ती वाचल्याचेही त्याने सांगितले.
आई सुषमा रोडगे (वय २७) हिच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सोमनाथ ऊर्फ परमेश्वर रोडगे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, पोलिस निरीक्षक महादेव नाईकवाडे करीत आहेत.
खर कारण काय हा प्रश्न कायम
आरोपी सांगतोय एक, पण तपासात समोर येतंय वेगळंच. त्यामुळे खरं कारण काय?" हाच प्रश्न पोलिसांसमोर आहे. पती-पत्नीच्या भांडणातून दोन मुलांचा बळी जाणं, ही गोष्ट पोलिसांनाही पटत नाहीये. त्यामुळे या घटनेची प्रत्येक बाजू तपासली जात आहे.