

घाटनांद्रा : पुढारी वृत्तसेवा
घाटनांद्रा येथील घाटात शनिवार (दि.20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पिशोर (ता. कन्नड) येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी शिवाजी गणपत टोंम्पे यांचा मृतदेह आढळुन आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पिशोर तालुका कन्नड येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी शिवाजी गणपत टोंम्पे वय (वर्ष 45) हे शनिवार रोजी सकाळी जळगाव येथे विक्री केलेल्या मालाचे पैसे घेण्यासाठी जात असल्याचे घरातुन सांगुन गेले होते. परंतु दुपारनंतर त्यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पिशोर पोलिसांच्या मदतीने लोकेशन काढून पाहणी केली. यावेळी त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा घाटात आढळून आला.
सदर घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे जमादार अनंत जोशी ज्ञानेश्वर ढाकणे, राठोड यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन मृतदेहाची पाहणी केली. सदरील मृतदेह खोल दरीत पडलेला असल्याने आणि रात्रीची वेळ व चोहोबाजूंनी दाट झाडी असल्याने मृतदेह वरती आणण्यास विलंब लागला. स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री उशीरा त्यांचा मृतदेह वरती आणला असता, त्यांच्या मृतदेहाजवळ नुआन नावाच्या विषारी औषधाची बाटली, पाण्याची बॉटल आदी साहित्य मिळुन आले.
सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. हा घातपात आहे की आत्महत्या याचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अनंत जोशी, ज्ञानेश्वर ढाकणे करीत आहेत.