

The bill was paid to the contractor before construction
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर येथील शाळा आणि गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून कोणतेही काम न करता ठेकेदाराला १ कोटी ४८ लाखाचे बिल दिल्याची धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह शाखा अभियंता, प्रभारी अभियंत्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. या प्रकरणी विभागीय चौकशी नेमून तपास सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री गोरे यांनी यावेळी दिला.
लासूर येथील शाळा आणि गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहारबद्दल विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. लासूर येथे शाळेच्या १२ खोल्या बांधण्यासाठी १ कोटी ३२ लाख, तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६० लाख रकमेस मान्यता दिली होती.
प्रत्यक्षात बांधकामापूर्वी ठेकेदाराला शाळा बांधकामापोटी १ कोटी १२ लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३५ लाख रक्कम मार्च २०२५ पर्यंत अदा केल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बिलाची रक्कम देण्यासाठी एसओपी तयार करावी, अशी मागणी त्यांनी केली. या बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य बोगस वापरले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
हे प्रकरण गंभीर असून बांधकामापूर्वी बिल काढल्याची कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात दिली. होण्यापूर्वीच बिल बांधकाम सुरू होण्यापूर्वीच बिल अदा केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आहे. याची प्राथमिक चौकशी झाली असून यामध्ये उप अभियंताचा कार्यभार असलेल्या पाटील यांना निलंबित केलेले आहे.
तसेच आणखी शाखा अभियंता, प्रभारी अभियंत्यांना निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. मात्र शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली. त्यावर मंत्री गोरे यांनी याप्रकरणी दोन महिन्यांत खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी हा मुद्दा अधिवेशनात मांडला. त्यांनी गुरुधानोरा व लासूर येथील अपूर्ण कामासाठी लाखो रुपयांची बिले कशी उचलली गेली याची सविस्तर माहिती सभागृहात मांडली. आ. सतीश चव्हाण यांनीही या विषयावर आवाज उठवला. केवळ अभियंत्यांना निलंबित करून चालणार नाही, तर संपूर्ण भ्रष्ट साखळीच तोडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.