

चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड वय ३५ वर्ष रा. नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर, याने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावली. सलग दोनवेळा हा प्रकार त्याने केला. ह.मु. हर्सुल मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथून आरोपीला तारखेसाठी पैठण येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान हजर केले होते.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षात न्यायाधीश गाडवे यांनी आरोपीला नाव गाव विचारीत असताना आरोपीने सदरील खटला छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालय चालविण्यात यावा या स्वरूपाचा अर्ज दाखल केला होता. परंतु सदरील खटला पैठण येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालविण्यात येत असल्याचा राग मनात धरून या आरोपीने पैठण येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्ष क्र. एक मध्ये पायातील चप्पल काढून न्यायाधीश गाडवे यांच्या अंगावर भिरकावली. परंतु ती चप्पल बाजूला जाऊन पडली त्यामुळे लगेच आरोपीने आपल्या पायातील दुसरी चप्पल पुन्हा काढून न्यायाधीश यांच्या अंगावर भिरकावली. या संदर्भात पैठण जिल्हा सत्र न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रमुणी ज्योतीराम निकम रा. नंदनवन कॉलनी छावणी छत्रपती संभाजीनगर यांनी पैठण पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दाखल केली आहे.
सदरील आरोपी अंतोन शामसुंदर गायकवाड नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर या परिसरात राहत होता. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने अहिल्यानगर पोलिसांनी सदरील आरोपीला दोन जिल्ह्यातून हद्दपार केले होते. यानंतर सदरील आरोपी पैठण येथे एका हॉटेल व्यावसायिक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वास्तव्य करून या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दोन महिने झाल्यानंतर या आरोपीला अटक करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस पथक अहिल्यानगर लपून राहत असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी या आरोपीने पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पोलिसाच्या खाजगी वाहनाची तोडफोड केली होती. ताब्यात घेऊन पैठण पोलीस ठाण्यात आणले असता यावेळी देखील मोठा गोंधळ घातला होता. तेव्हापासून हा आरोपी मध्यवर्ती कारागृह हर्सुल येथे अटक आहे.