

Tension in Aurangpura following a collision involving a two-wheeler
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याने जाणाऱ्या महिलेला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीला एका १६ वर्षीय दुचाकी चालकाने धक्का दिला. मुलगी खाली पडून किरकोळ जखमी झाली.
मात्र या घटनेनंतर क्षणात मोठा जमाव जमल्याने मोठा गोंधळ उडाला होता. ही घटना बुधवारी (दि.२२) रात्री ११ वाजेच्या सुमारास औरंगपुरा भागातील महात्मा फुले चौकाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी फौज फाट्यासह धाव घेतली. संतप्त जमावाची समजूत घालून धडक देणाऱ्या मुलाला ठाण्यात आणले. त्यामुळे तणाव निवळला. दरम्यान, त्या मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी ठाण्यात बोलाविले होते.
मुलाला त्याच्या वडिलांनी दुचाकी घेऊन जाण्यास मज्जाव केला होता. तरीही त्याने एका मित्राची गाडी घेऊन निघाल्यानंतर हा अपघात घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. मात्र घटनास्थळी दोन समुदाय समोरासमोर आल्याने काहीकाळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.