Teacher- Student Emotions : शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थी इतके भावनिक का होऊ लागलेत?

अलिकडे सोशल मीडियावर बदली झालेल्या शिक्षकांना जाऊ न देण्याच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत.
Teacher- Student Emotions
Teacher- Student Emotions : शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थी इतके भावनिक का होऊ लागलेत? File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद वा खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्याची परंपरा आहे. परंतु अलिकडे सोशल मीडियावर बदली झालेल्या शिक्षकांना जाऊ न देण्याच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. अनेक विद्यार्थी बदली झालेल्या शिक्षकांच्या भोवती गराडा घालतात.. कोणी मोठ्याने रडतो, कोणी गेट बंद करतात, कोणी गाडी अडवितात..काही शिक्षक आपल्यावर प्रेम करणार्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतात अशा क्लिप्सचा धुमाकूळ फेसबुक, इन्स्टा, व्टिटर आदी सोशल मीडियावर सुरू आहे.

Teacher- Student Emotions
Job fraud case : बँकेत नोकरीचे आमिष दाखवून २४ जणांना १६ लाखांचा गंडा

यंदा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस काहीसा उशिरा प्रारंभ झाला. बदली झालेल्या शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या काही क्लिप्स पाहिल्या असता त्या भावनेच्या अनुषंगाने रंगतदार केल्याचे दिसते. एका क्लिपमध्ये शिक्षिकेची बदली झाल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थीनी त्यांना गराडा घालीत असून, गेट बंद करीत असल्याचे दिसते. शाळेचे गेट बंद, टिचर आम्ही तुम्हाला दुसर्‍या शाळेत जाऊ देणार नाही, असे या क्लिपवर लिहिले आहे.

आणखी एका क्लिपमध्ये तर गावकरी, विद्यार्थी एकत्र गोळा होत बदली झालेल्या शिक्षकाची कार अडविताना दिसत आहेत. एकाच शाळेत सलग 25 वर्षाहून अधिक काळ सेवा बजाविणार्या शिक्षकाची बदली झाल्यानंतर शिक्षक सहकारी शिक्षकाच्या गळ्यात पडून रडतो, असे एक क्लिप दर्शविते. खरंच माझा जीव की प्राण होता, ही मुलं..अशी क्लिप बनविण्यात आली असून, त्यात रडणार्या मुलींना शिक्षिका समजावून सांगत आहे. आजसे अपना वादा रहा, अशी ट्यून एका क्लिपमध्ये टाकण्यात आली आहे. काही ठिकाणी तर विद्यार्थी अक्षरश: हंबरडा फोडतात, असे दिसत आहे. तेरे मेहेरबानियाँ, जरा विसावू या वळणावर, तुम जो नही हो, खेळ मांडला आदी गाण्यांच्या धूनचा वापर क्लिप्समध्ये आहे.

Teacher- Student Emotions
Sambhajinagar News : मनपाची प्रभागरचना अंतिम, निवडणुकीची उलटी गणती सुरू, दिवाळीपूर्वीच प्रचाराचा नारळ फुटणार

एकाच वेळी अनेक शिक्षकांच्या बदल्‍या हा मुलांसाठी भावनिक आघात?

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष किशनराव इदगे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांतील मुलांचे व शिक्षकांचे भावनिक बंध निर्माण होत आहेत. यातून शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांचे एक संवेदनशील आणि वास्तवदर्शी चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. विद्यार्थ्यांभोवती केंद्रित झालेली शिक्षणपद्धती, ज्ञानरचनावादामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणारा वाव, शिक्षकांचा मार्गदर्शक व सुलभक म्हणून बदललेला रोल हे सगळे सकारात्मक पाऊल ठरते. मात्र, संगणकीय बदल्यांमुळे एकाच शाळेतील अनेक शिक्षकांची एकाचवेळी बदली होणे, हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक भावनिक आघात आहे. पूर्वी एका शिक्षकाच्या बदलीनंतरही इतर शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे भावनिक आधारस्तंभ ठरत असत. पण आता, जुने स्नेह, जिव्हाळा, मार्गदर्शन आणि प्रेम या गोष्टी हरवत चालल्याची जाणीव होते. हे चित्र जरी तात्पुरते असले, तरी काळानुसार विद्यार्थी नवीन शिक्षकांशीही तितक्याच आपुलकीने नातं जोडतात. अशा वेळी बदल्यांची प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विचार होणे, ही काळाची गरज आहे.

तुमच्याशिवाय वर्ग कसा भरणार?

शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी इमारत नसून, ती म्हणजे आठवणींचं घर असते.त्या घराचे मुख्य शिल्पकार शिक्षक असतात. त्यांचं मार्गदर्शन, शिकवण, प्रेम, आणि कधी-कधी दिलेला सज्जड दम हे विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर घर करून राहत. अशा शिक्षकांची जेव्हा बदली होते, तेव्हा विद्यार्थ्यांना ती नकोशी वाटते. शासन धोरणानुसार शिक्षकांची बदली ही एक नियमित प्रक्रिया असली, तरी ती केवळ प्रशासनिक निर्णय नसतो, तो भावनांचा झरा असतो. जे शिक्षक अनेक वर्षे एका शाळेत विद्यार्थ्यांना घडवत असतात, त्यांच्या समर्पणाने शाळेचं रूप बदलतं. त्या शिक्षकांच्या बदलीची बातमी शाळेत जशी पोहोचते, तशी प्रत्येक वर्गात, विद्यार्थ्याच्या मनात हळव्या भावना दाटून येतात. सर, आम्हाला अजून शिकवायचं नव्हतं का?, तुम्ही का जाताय?, तुमच्याशिवाय वर्ग कसा भरवेल? - अशा अनेक भावना विद्यार्थ्यांच्या मनात उभ्या राहतात, असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस युवराज अंधारे यांनी व्यक्‍त केले.

मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे काय?

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद काळे म्हणाले, परस्पर संबंधांमध्ये दोन व्यक्तींमध्ये आपोआप जवळीक निर्माण होते, जेव्हा बर्‍याच काळ या दोन व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात राहतात.आज शाळेतील मुले आपला बहुतांश वेळ हा शाळेत आणि शिक्षकांच्या सोबत घालवतात. त्यात पुन्हा शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. शिक्षा करणे, मारणे, छडी लागे छम छम या संकल्पना आता आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षक आई-वडिलांन इतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जवळचे वाटतात.शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि मुलांमधील संवेदनशीलता याचा देखील शिक्षक विद्यार्थी संबंधांमध्ये महत्त्वाचा भाग आहे, असे ते म्हणाले.

मुलांच्या मानसिक समस्यांचा विशेष अभ्यास करणारे मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे या विषयावर मतप्रदर्शन करताना भावनेशी संबंध असल्याचे नमूद केले. शाळा म्हणजे मुलांचे दुसरे घरच असते. शिक्षक-विद्यार्थी यांचे नाते हे केवळ शिकवणं आणि शिकणं इतकेच नसते. तर त्यात प्रेम, काळजी, समजून घेणे, मार्गदर्शन हे सर्व असते. शिक्षक अनेक वर्षं एकत्र असतात, त्यामुळे मुलांना त्यांच्या सवयी, बोलण्याची शैली, शिकवण्याची पद्धत सगळे परिचयाचे वाटते.हा स्नेह इतका खोल जातो की शिक्षक म्हणजेच आधार वाटू लागतो. एखादा शिक्षक जर कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिला असेल, समजून घेत असेल, चुका दाखवत असेल पण त्याच वेळी प्रेमाने मार्गदर्शन करत असेल, तर त्या शिक्षकावर मुलं मनापासून विश्वास ठेवतात.

अशा व्यक्तीचा अचानक निघून जाणे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेच्या चौकटीत एक मोठी पोकळी निर्माण होणे. लहान वयातल्या मुलांना स्थिरता हवी असते. त्यांना रोज तोंड दिसणार्‍या शिक्षकाचा अचानक अभाव जाणवतो.आता नवीन शिक्षक कसे असतील?, आपल्याला समजून घेतील का?, ते देखील तितकेच प्रेम करतील का? - असे अनेक प्रश्न त्यांना अस्वस्थ करतात.भावनिक गुंतवणूक -शिक्षकांनी वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन, शिक्षणाबरोबर दिलेल्या गोष्टी - गोष्टी, खेळ, बक्षिसं, सण, सहली - या सगळ्यातून मुलं त्या शिक्षकांशी भावनिक पातळीवर जोडली जातात.शिक्षक म्हणजे त्यांच्या आठवणींचा भाग होतो, आणि अशा आठवणींशी जुळलेली व्यक्ती दूर जाणे, हे त्यांना सहन होत नाही.काही वेळा मुलांना वाटतं की अजून काही शिकायचं होतं, अजून काही बोलायचं होतं, अजून काही वेळ घालवायचा होता त्या शिक्षकांबरोबर.अचानक झालेली बदली ही त्या नात्याची पूर्णता नाकारते, त्यामुळे मनात अधूरतेची भावना निर्माण होते, असे डॉ. शिसोदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news