

Tax collection of Rs 100 crore in one and a half months, record-breaking performance of the Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शास्ती से आझादी आणि शास्ती से मुक्ती, ही मोहीम राबवत आहे. यात थकीत शास्तीवर पहिल्या महिन्यात ९५ आणि दुसऱ्या महिन्यात ७५ टक्के सूट दिली जात असून, या मोहिमेमुळे १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या केवळ दीड महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ९४ कोटी २० लाख आणि पाणीपट्टीचे ५ कोटी असे एकूण ९९ कोटी २० लाख रुपये जमा झाले आहेत. महापालिकेच्या इतिहासातील ही रेकॉर्डब्रेक वसुली आहे. आता १ सप्टेंबरपासून शास्तीवर ७५ टक्के सवलत दिली जात असल्याचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी व्याजासह १३०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरवर्षी महापालिका आर्थसंकल्पात मंजूर केलेल्या कर वसुलीच्या उद्दिष्टाच्या जवळही पोहोचत नाही. यंदा प्रशासनाला मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचे सुमारे ८५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी मालमत्ता करापोटीच प्रशासनाला ७०० कोटी रुपयांची या वसुली करायची आहे.
वसुलीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी मालमत्ताधारकांना सामान्य करामध्ये सवलत देण्यात आली. तरीही १४ जुलैपर्यंत प्रशासनाला ६३ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले होते. महापालिकेकडून सवलत देऊनही वसुलीची आकडेवारी वाढत नसल्याने नागरिकांच्या मागणीवरून प्रशासक जी. श्रीकांत यांनी थकीत कराच्या शास्तीवर ९५ आणि ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला.
यात १५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत शास्ती से आझादी आणि १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर शास्ती से मुक्ती, अशी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. शास्ती से आझादीला थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिला. केवळ महिन्याभरात ३७ हजार २५९ थकबाकीदारांनी ८२ कोटी ५७लाख रुपये मालमत्ता कर आणि ३ कोटी ५० लाख पाणीपट्टी असे एकूण ८६ कोटी ०७ लाख रुपयांची वसुली झाली.
त्यामुळे शास्तीवरील ९५ टक्के सवलतीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या १५ दिवसांत ६ हजार ८१ थकबाकीदारांनी ११ कोटी ६३ लाख रुपयांचा मालमत्ता कर आणि १ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी असे एकूण १३.१३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. तर दीड महिन्याच्या मोहिमेत ४३ हजार ३४० थकीत मालमत्ताध- ारकांनी ९४.२० कोटी मालमत्ता कर आणि ५ कोटी पाणीपट्टी असे ९९.२० कोर्टीचा कर भरला आहे.
महापालिकेने कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा शास्तीमध्ये भरमसाठ सूट देणारी योजना राबविली आहे. या योजनेचा लाभमहापालिकेला मिळाला असून, १ एप्रिल ते ३१ ऑगस्टपर्यंत मालमत्ता करापोटी १५७ कोटी २० आणि पाणीपट्टीचे १६ कोटी ५० लाख असे एकूण १७० कोटी २० लाख रुपये वसूल करण्यात करमूल्य निर्धारक व संकलक विभागाला यश आले आहे.