

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा ऐन पावसाळ्यातही अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमधील नियमित जलस्रोत अजूनही सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील ४९ गावांना ७९ टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत हे टँकर सुरू ठेवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर हे टँकर बंद करण्यात आले. परंतु यंदा अर्धा पावसाळा संपला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणचे आटलेले नियमित जलस्रोत अजूनही सुरू झाले नसल्याने वैजापूर, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.
परिणामी, या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत असून, तसे प्रस्तावही सादर होत आहेत. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर, सिल्लोड उपविभागीय अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर कार्यालयांकडून आलेल्या टँकरच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. सिल्लोड नगर परिषद क्षेत्रासह इतर ४८ गावांमध्ये एकूण ७९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ही मंजुरी ३१ जुलैपर्यंत असणार आहे. मंजुरी मिळालेल्या गावांपैकी काही गावांमध्ये टँकरच्या प्रत्यक्ष खेपांना सुरूवात झाली आहे. तर उर्वरित गावांना येत्या एक दोन दिवसांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल, अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे.
काटेपिंपळगाव, मालुजा खुर्द, हदीयाबाद, शिरेसायगाव, शंकरपूर, वडाळी, हर्सल सावंगी, फुलशिवरा, दिघी काळेगाव, नरसापूर, शिरेगाव, भालगाव, खडकवाघलगाव, आगाठाण, चिंचखेडा, शहापूर, सनव, वैरागड, शिल्लेगाव, सुलतानाबाद, सिद्धनाथवाडगाव, तांदूळवाडी, बोलठाण, उत्तरवाडी, अकोलीवाडगाव, कनकोरी, कोळघर, बुट्टेवाडगाव, वजनापूर, शेकटा, जांभाळा, घोडेगाव, महेबुबखेडा, येसगाव, डोमेगाव बोरगाव, देवळी, मेढी-खोपेश्वर, नवीन हिरापूर, वाहेगाव, रमाईनगर, गाडेकर वस्ती, हिरापूरवाडी, बाळापूर व वस्त्या, फत्तेपूर, गोलटगाव, गांधेली, रामपूर, बेगनाईक तांडा, कार्लोळ, एकलहरे व महंमदपूर, दरकवाडी.