

छत्रपती संभाजीनगर : गावाकडील जमिनीच्या प्रकरणात केस दाखल करण्यासाठी दबाव टाकून नेहमी पाठलाग करणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने थेट सिडको उड्डाणपूल गाठून उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी चौकात उभ्या असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी धाव घेत तिला सुखरूप खाली उतरविले. ही घटना मंगळवारी (दि. २२) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात मूळ गाव असलेली अंदाजे ४५ वर्षीय विवाहिता बीड बायपास भागात राहते. तिचा पती रिक्षाचालक आहे. महिला चार-पाच घरी जाऊन स्वयंपाकाचे काम करते. तिला एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. गावाकडे पतीच्या नावावरील सिलिंगची जमीन अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या नावे करून दिलेली आहे. मात्र गेल्या चार पाच महिन्यांपासून डोळ्याला गॉगल, तोंडाला रुमाल आणि डोक्यावर टोपी घातलेला एक व्यक्ती त्या महिलेचा पाठलाग करतो. एकवेळ तो तिला रिक्षात घेऊन गेला. तिच्या पतीची ओळख सांगून घरातील सर्व माहिती सांगितल्याने महिला त्याच्याशी बोलली. मात्र नंतर त्याने तिला एकदिवस गोकुळ स्वीटच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने रिक्षात घेऊन गेला. ती जमीन ज्याच्या नावावर तुम्ही केली आहे, त्याच्यावर केस करा नाही तर तुमचा मर्डर करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे महिला भयभीत झाली. तेव्हापासून ती गावाकडे गेली तरी तो तिथेही येऊ लागला. महिला तणावात गेली. तिला झोप लागेना. पती संशय घेईल याची भीती मनात बसल्याने ती मंगळवारी थेट सिडको उड्डाणपुलावर गेली.
महिला बराच वेळ सिडको उड्डू-ाणपुलाच्या बसस्थानकाच्या बाजूच्या दिशेने विजेच्या खांबाला पकडून उडी घेण्याचा प्रयत्न करू लागली. पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी थांबून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार सुमन बावस्कर, सुभाष फुले, रमेश नजन यांनी पुलावर धाव घेत महिलेला सुखरूप खाली आणले. दामिनी पथकही दाखल झाले. महिलेच्या पतीलाही बोलावले. त्यानंतर तिची समजूत घालून सर्व माहिती घेतली. दामिनी पथकाने महिलेला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली. मात्र तिच्या माहितीत विसंगती आढळून येत असल्याने अखेर अज्ञाताविरुद्ध एनसी दाखल करण्यात आली आहे.