

Take action against bogus doctors
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचरांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, केंद्रांच्या सुरक्षा व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंजूर २१८ पदांपैकी केवळ ७३ कर्मचारी कार्यरत असून, तब्बल १४५ पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरावीत. तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आली.
जि.प. आरोग्य समितीची बैठक बुधवारी (दि. २७) सभापती अनिता मोठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे वाढते प्रमाण आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर ठरत असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, अशी मागणीही सदस्यांनी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचर उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत जि. प. च्या शेष निधीतून रिक्त पदे भरण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा झाली.
तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई
बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी स्पष्ट केले. सर्पदंश व कुत्रा चावण्याच्या घटनांबाबत पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. क्षयरोग रुग्णांना सदस्यांनी दत्तक घेऊन दरमहा फूड बास्केट उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.