

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ विजयी झाले. शिरसाठ यांना ४५५ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना केवळ १३५ मते मिळविता आली. अपक्ष उमेदवार इसाक खान यांना ३५ मते मिळाली. शिरसाठ यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच निश्चित कोट्यापेक्षा १४२ मते अधिक मिळविल्याने पहिल्या दोन तासांतच निवडणुकीचा निकाल घोषित झाला.
शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयाच्या केंद्रावर सकाळी आठ वाजता चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. आधी सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करून वैध-अवैध मते बाजूला करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांतील ६३७ मतदारांपैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. या ६३० पैकी पाच मते अवैध ठरली. त्यामुळे विजयी मतांचा कोटा ३१३ निश्चित करण्यात आला. पहिल्याच फेरीत महायुतीचे सुहास शिरसाठ यांनी ४५५ मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला.
महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना केवळ १३५ मतांवर समाधान मानावे लागले. पराभवाचे चित्र स्पष्ट होताच ते कार्यकर्त्यांसह सकाळी ९.३० वाजताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. अपक्ष उमेदवार इसाक खान संदू खान यांना ३५ मते मिळाली. शिरसाठ आणि लोखंडे यांच्या मतांतील अंतर ३२० इतके होते. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे मोठे यश मिळाल्याचे चित्र आहे.
केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष मतमोजणीची प्राथमिक माहिती मिळताच बाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. देवगिरी महाविद्यालयाशेजारी सकाळी नऊ वाजेपासूनच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळत डीजेच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पुढील एक तास हा जल्लोष सुरूच होता.
मतमोजणीसाठी अधिकारी सकाळपासूनच हजर; दुपारी १२ वाजता प्रमाणपत्र बहाल
मतमोजणीसाठी अधिकारी-कर्मचारी पहाटे सहा वाजताच हजर झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता विजयी उमेदवार शिरसाठ यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे , माजी खासदार डॉ भागवत कराड आदी उपस्थित होते.
रस्ता बंद केल्याने विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची गैरसोय
मतमोजणी केंद्रात आणि केंद्राबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. व्हीट्स हाटेलपासून एकनाथ नगरपर्यंतचा रस्ता बेरिकेटस लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे लोकप्रतिनिधींसोबत आलेल्या कार्यकर्त्याना मात्र कोणत्याही पासशिवाय मोजणी केंद्रात प्रवेश देण्यात आला.
आमची एकूण ४१९ मते होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही विनंती केली. तरीही विरोधकांनी उमेदवार दिला. आम्हाला या निवडणुकीत ४५५ मते मिळाली. घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांनी त्यांचे आणि आमचे संख्याबळ किती होते, याची माहिती घ्यावी. शिवाय त्यांनी एमआयएमची दुसऱ्या पसंतीची मते कशी मिळविली, याचे उत्तर द्यावे.
अतुल सावे, मंत्री.
आमचे संख्याबळ कमी होते. तरीही ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे निवडणुकीत उभे राहिलो. जेवढे आमचे संख्याबळ होते त्यापेक्षा सहा ते सात मते जास्तच मिळाली. या निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला.
गणेश लोखंडे, पराभूत उमेदवार
महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वास टाकला कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला. आमच्याकडे ४१२ संख्याबळ होते. आम्हाला त्यापेक्षाही अधिक मते मिळाली, सर्वाच्या विश्वासाला उतरण्याचा प्रयत्न केला जाईल.
सुहास शिरसाठ, नवनिर्वाचित आमदार