

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जालना विधान परिषद मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपने एकहाती विजय मिळविला. या निवडणूकीचा निकाल सोमवारी (ता.22) सकाळी 9ः23 वाजता जाहीर झाला. यामध्ये भाजपचे सुहास शिरसाठ यांनी 455 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 135 मते मिळाली. अपक्ष उमेदवार इसाक संदू खान यांना 35 मते मिळाली. पहिल्याच फेरीत मतांचा कोटा पूर्ण झाल्याने सुहास शिरसाठ यांना विजयी घोषित करण्यात आले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला.
शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सकाळी आठ वाजता या मतमोजणीला चार टेबलवर सुरवात झाली. सुरवातीला सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. यामध्ये वैध, अवैध मते बाजूला करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यातील 637 मतदारांपैकी 630 मतदारांनी मतदान केले होते. या 630 पैकी पाच मते अवैध ठरली. त्यामुळे विजयी मतांचा कोटा 313 निश्चित करण्यात आला. प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. ही मतमोजणी दोन फेरीत होणार होती, परंतू पहिल्याच फेरीत महायुतीचे सुहास शिरसाठ यांनी 455 मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला.
महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना केवळ 135 मतांवर समाधान मानावे लागले. पराभवाचे चित्र स्पष्ट होताच ते कार्यकर्त्यांसह सकाळी 9ः30 वाजताच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. अपक्ष उमेदवार इसाक खान संदू खान यांना 35 मते मिळाली. शिरसाठ आणि लोखंडे यांच्या मतांतील अंतर 320 इतके होते. त्यामुळे या निवडणूकीत महायुतीचे मोठे यश मिळविल्याचे चित्र आहे.
उमेदवारांना अशी मिळाली मते
सुहास शिरसाठ - 455
गणेश लोखंडे - 135
इसाक खान - 35
अवैध मते - 5
एकूण ः 630
केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
देवगिरी महाविद्यालयाशेजारी सकाळी नऊ वाजेपासूनच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. त्यानंतर अर्ध्या तासातच मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले आणि बाहेर एकच जल्लोष सुरू झाला. फटाक्याची आतीषबाजी आणि गुलाल उधळत डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पुढील एक तास हा जल्लोष सुरूच होता.
मतमोजणीला 8 वाजता सुरूवात
मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचारी पहाटे सहा वाजताच हजर झाले होते. मतमोजणी क्रियेला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. निवडणूक निरीक्षक संजय कोलते, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
मतमोजणीला मतमोजणी केंद्रात आणि केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकाबाजुला व्हीट्स हाटेल तर दुसऱ्या बाजुला एकनाथ नगर येथे बॅरिकेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. या मतमोजणी केंद्रात निवडणूक विभागाने दिलेल्या पास असेल तर प्रवेश दिला जात होता. मात्र लोकप्रतिनिधींसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना पासबाबत कोणतीही विचारणा करण्यात येत नव्हती.