

Student accident relief grant approved
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शालेय शिक्षण विभागाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यातून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे.
पुणे येथील शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाने पात्र २२६ विद्यार्थ्यांसाठी एकूण १ कोटी ७३ लाख ४० हजार ६५७ रुपयांच्या निधीची मागणी नोंदविली होती. त्यानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रस्तावातील विद्यार्थ्यांची संख्या आणि दाव्यांची पडताळणी अचूकपणे करूनच निधी वितरित करावा. तसेच नुकसानभरपाई प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास, गंभीर अपंगत्व आल्यास, हलक्या जखमांच्या प्रकरणात मदत दिली जाते. ही योजना शालेय विद्यार्थ्यांना अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून दिलासा देण्यासाठी राबवली जाते. निधीचे वाटप जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या संमतीने केले जाते.