

छत्रपती संभाजीनगर : घर गाठण्यासाठी राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर या परिसरातील नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत असून, या भागात मूलभूत सुविधांचा मोठ्याप्रमाणावर अभाव आहे.
राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर या भागात ना रस्ते, ना पिण्याचे पाणी, अंत्यविधीसाठी मृतदेहालाही रेल्वेरूळ पार करून न्यावे लागते. येथील रहिवाशांना दुर्गम खेड्यापेक्षाही वाईट अक्षरशः माणसालाही लाज वाटावी या स्थितीत जीवन जगावे लागत आहे. पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होते.
शहराचा भाग असलेल्या राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर भागात बहुतांश कामगारवर्ग वास्तव्याला आहे. हात मजूर, कंपनीत सकाळपासून ते रात्रीपर्यंत कष्ट करून थकलेले नागरिक जेव्हा घरी परततात, तेव्हा त्यांना रेल्वे रुळाच्या अलीकडे आपली वाहने उभी करावी लागतात. त्यानंतर चिखल तुडवत अंधारात वाट शोधत घर गाठावे लागते. या परिसरात रस्ता नसल्यामुळे नागरिकांना गॅस सिलिंडरसारखी जड वस्तूही डोक्यावरून वाहून घरी न्यावी लागते. महिलांसह वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळकरी मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी महिलांना रेल्वे रूळ पार करत धोकादायक कसरत करावी लागते. या मागीवर अपघातांची मालिकाच सुरू असते.
तर या भागातील सुरक्षा व्यवस्था असून, नसल्यासारखी आहे. एवढेच नव्हे, तर अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठीही रस्ता उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना तासनतास वाट पाहावी लागते किंवा मृतदेह उचलून कसरत करत रूळ ओलांडून न्यावा लागतो. या भागात पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. नळद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. यासंबंधी महापालिकेकडे तक्रारी केल्या. तसेच मंत्री, खासदार, आमदार व नगरसेवकही निवडणुकीवेळी मत मागण्यापुरते येतात. त्यानंतर या भागाकडे दुर्लक्ष करतात. दरम्यान पावसाळ्यात ही स्थिती अधिकच बिकट होत असते. हा भाग शहराचा असूनही गावापेक्षा वाईट अवस्था आहे. या वसाहतींना तातडीने नागरी सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली असून अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राजनगर, बंबाटनगर आणि मुकुंदनगर भागात पक्का रस्ता तयार करावा, पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था करावी, रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग उभारावा, पथदिवे व्यवस्था सुधारावी.