

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर चिकलठाणा गावठाण परिसरात ३० मीटर रस्त्याआड येणारी अनेक बांधकामे महापालिकेने भुईसपाट केली. यात बहुतांश व्यापाऱ्यांचा समावेश असून, दुकानांची पाडापाडी झाल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
त्यांच्यासाठी महापालिकेने चिकलठाण्यात सव्वाएकर जागेत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जालना रोडवर महापालिकेने मुकुंदवाडी ते केंब्रीज शाळा चौक यादरम्यान पहिल्या टप्प्यात ३० मीटर रस्त्यासाठी रुंदीकरण मोहीम राबविली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पथकाने मुकुंदवाडी ते एपीआय चौकपर्यंत मोहीम राबविली. यात शेकडो बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
या पाडापाडीत चिकलठाणा गावठाणातील सुमारे अडीचशे मालमत्ताध-ारकांना फटका बसला. त्यात अनेकांच्या दुकानांसह घरांचा समावेश होता. अख्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या दुकानांवर सुरू होता, तेच महापालिकेच्या पथकाने भुईसपाट केले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली आहे. त्यातील अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी या सर्वांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाच्या जागेत व्यापारी संकुल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. दुकाने बांधून जागेचे भाडे महापालिका व्यावसायिकांकडून वसूल करणार आहे. हे व्यापारी संकुल दुमजली राहणार आहे.
या शासकीय जागेतील एक एकरमध्ये महापालिका उद्यान उभारणार आहे. त्यात रस्त्यात बाधित होणारे महापुरुषांचे पुतळे स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. दरम्यान, हे व्यापारी संकुल उभारण्यास काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत बाधितांना वाट पाहण्याची वेळ आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या या जागेवर सुमारे ६० गाळे बांधली जाणार आहेत. चिकलठाण्यात रस्ता रुंदीकरणामुळे ज्यांचे रोजगार गेले अशांना याठिकाणी प्राधान्याने गाळे दिले जाणार आहेत. या कामाचे अंदाजपत्रक तयार कण्यात येत असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.