

Body of 15-year-old boy found in Karnapura well
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कर्णपुरा भागातील एका विहिरीत १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार सोमवारी (दि.१६) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. प्रणव गौतम मोरे (रा. कर्णपुरा) असे मुलाचे नाव आहे. तो रविवारी दुपारपासून बेपत्ता झाला होता. दरम्यान, घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.
प्रणव हा नववी पास होऊन यंदा दहावीच्या वर्गात गेला होता. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास तो घरच्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने कुटुंब, नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो काही मिळून आला नाही.
त्यामुळे छावणी पोलिस ठाण्यात रात्री बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्रभर परिसरात शोध घेतला. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रणवचे काका राहुल मोरे यांना तो कर्णपुरा परिसरातील एका विहिरीत पडल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी तात्काळ अग्निशमन आणि पोलिसांना कळविले. प्रणवला वेशुध्दावस्थेत विहिरीतून बाहेर काढत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रणवला तपासून मृत घोषित केले. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाइकांच्या माहितीनुसार, त्याच्या अंगावर वरखडे आहेत. मानेला जखम झालेली आहे. विहिरीपासून ३० फूट अंतरावर त्याची चप्पल मिळून आली. त्यामुळे त्याचा घातपात झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय विवेक जाधव यांच्या माहितीनुसार, प्रवणचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यामध्ये त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद आहे. पालकांशीही बोलणे झाले. त्यांची अद्याप काही तक्रार आ-लेली नाही. अधिक तपास करीत आहोत.