

Structural audit of old ST buildings underway
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट गुरुवार (दि.६) पासून सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली असून, ऑडिट अहवालानंतर धोकादायक ठरणाऱ्या इमारतींबाबत दुरुस्ती, पुनर्बाधणी किंवा पाडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यातील बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा तसेच इतर एसटीच्या इमारतींची खासगी एजन्सीच्या तज्ज्ञ अभियंत्यांकडून पाहणी केली जात आहे. या एजन्सीचे एक पथक गुरुवारी शहरात दाखल झाले असून त्यांनी विभागीय कार्यालयाच्या इमारतीसह मुख्य बसस्थानकांतील सर्वच इमारतीची पाहणी केली. अनेक इमारती तीन ते चार दशकांपूर्वी बांधण्यात आल्याने त्यांची संरचनात्मक क्षमता तपासणे आवश्यक झाले आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे, गळती, सिमेंट काँक्रीटचे नुकसान आणि गंजलेल्या लोखंडी सळ्या आढळत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ऑडिटमध्ये प्रत्येक इमारतीची पाया, खांब, बीम, स्लॅब, छत आणि संपूर्ण संरचनेची क्षमता तपासली जात आहे. त्यानुसार इमारती सुरक्षित, दुरुस्तीयोग्य किंवा अतिधोकादायक अशा श्रेणीत वर्गीकृत करण्यात येतील. धोकादायक घोषित झालेल्या इमारतींचा वापर तातडीने बंद करून पर्यायी व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाने राज्यभरातील जुन्या इमारतींचे टप्प्याटप्प्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील इमारतींची तपासणी सुरू झाली आहे. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार दुरुस्ती पुनर्बाधणीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
जिल्ह्यातील एसटीच्या प्रमुख इमारती
प्रादेशिक कार्यालय - १
विभागीय कार्यालय - १
प्रमुख बसस्थानके-८
आगार (डेपो) - ८
विभागीय कार्यशाळा-१
मुख्य कार्यशाळा-१
ग्रामीण बसस्थानके व बस थांबा इमारती अनेक, तसेच इतर प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे.