

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी जल बेल मोबाईल अॅपच्या माध्यमातून राबविण्यात आलेली डिजिटल मतदार जागृती मोहीम यशस्वी ठरली असून, अवघ्या १६ दिवसांत नागरिकांनी जल बेल अॅपवर २ लाख ५३ हजार ७५७ वेळा भेटी दिल्या आहेत. तर ७५ हजारांहून अधिक जणांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
मतदानाबावत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून जल बेल अॅप तयार करण्यात आले असून, डिजिटल मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली. या जनजागृती मोहिमेत दररोज विविध महत्त्वाच्या विषयांवर भर देण्यात आला. यामध्ये मतदान केंद्राची माहिती, मतदार स्लिप, मतदानाची पूर्वतयारी, मतदान प्रक्रिया, प्रभाग रचना, ईव्हीएम मशीनचा वापर, मतदानदिवस मार्गदर्शन तसेच अंतिम निकालापर्यंतची सविस्तर माहिती नागरिकांना सोप्या व सहज भाषेत उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच नागरिकांमधील मतदान प्रक्रियेविषयीचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रभागनिहाय डिजिटल ईव्हीएम डेमोचे सादरीकरणही करण्यात आले होते.
या डेमोमुळे प्रत्यक्ष मतदानापूर्वी नागरिकांना ईव्हीएमवर मतदानाचा अनुभव घेता आला. त्यामुळे मतदानाबाबतची भीती व संभ्रम मोठ्या प्रमाणात कमी झाली. या डिजिटल मोहिमेत व्हिडिओ, ऑडिओ संदेश, पोस्टर्स, अॅनिमेशन व डिजिटल ग्राफिक्सचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यामुळे सर्व वयोगटांतील नागरिकांपर्यंत निवडणूकविषयक माहिती सहज पोहोचली. सध्या जल बेल अॅपचे ७५ हजारांहून अधिक डाउनलोड्स पूर्ण झाले असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान मागील वर्षात या अॅपला एकूण ११ लाख ५६ हजार ४०८ व्हिजिट्स मिळाल्या होत्या. या यशाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जल बेल अॅप हे महापालिका प्रशासनासाठी डिजिटल जनजागृतीचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्यात प्रशासनाला चांगले यश आल्याचे हे मॉडेल अधिक कसे यशस्वी होईल यासाठी प्रशासन प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.